मध्य रेल्वेच्या `राजधानी`मध्ये मिसळीचा बेत फसला
मध्य रेल्वेवर धावलेल्या राजधानी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना नाश्त्याला मिसळ देण्याचा घाट रेल्वे प्रशासनानं घातला होता.
सचिन गाड, किरण ताजणे, प्रतिनिधी, झी मीडिया : मध्य रेल्वेवर धावलेल्या राजधानी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना नाश्त्याला मिसळ देण्याचा घाट रेल्वे प्रशासनानं घातला होता. पण मिसळीला लागणाऱ्या मुगांनी रेल्वेचे मनसुबे धुळीला मिळवले. मध्य रेल्वेसाठी शनिवार हा ऐतिहासिक होता, कारण मध्य रेल्वेवर पहिल्यांदाच दिल्लीला जाणारी राजधानी एक्स्प्रेस धावणार होती. हा क्षण अधिक संस्मरणीय करण्याचा चंग रेल्वेनं बांधला होता. राजधानीनं दिल्लीला निघालेल्या प्रवाशांना चक्क मराठमोळी मिसळ खायला घालण्याचा रेल्वेचा बेत होता. पण मुगांनी रेल्वेचा वांदा केला. कारण मिसळीसाठी भिजत घातलेल्या मुगांना मोडच आला नाही.
प्रवाशांना स्थानिक चवीचे पदार्थ मिळावेत असा रेल्वेचा आग्रह आहे. मिसळीसारख्या पदार्थाचं मुंबईकरांनाही अप्रूप आहे. मुंबईला मिसळ मिळाली नाही तर प्रवाशांना नाशिकची मिसळ खायला घालायची असं नाशिककरांचं म्हणणं पडलं. मिसळीच्या मुद्यावर रेल्वेचे अधिकारी मात्र मुग गिळून बसलेत. बहुतेक मिसळीच्या मुगाला ते मोड यायची वाट पाहत असावेत.