मुंबई : धक्कादायक बातमी. शहरातील प्रसिद्ध केईएम रुग्णालयात एका २० वर्षीय रुग्णाने गळफास लावून आत्महत्या केली. या रुग्णाची कोविड-१९ची चाचणी करण्यात आली होती. मात्र, त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. रुग्णाने बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, रुग्णाने आत्महत्या केल्याने केईएम रुग्णालय परिसरात या घटनेनंतर तणावाचे वातावरण होते. या आत्महत्येप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव शहाजी जानू खरात आहे. त्याला रक्ताचा कॅन्सर होता. त्याच्यावर केईएममध्ये उपचार सुरु होते. तो चेंबूर येथे वास्तव्यास होता. त्याला रक्ताचा कॅन्सर असल्याने त्यांच्यावर चेंबूर येथील एका रुग्णालयात प्राथमिक उपचार करून केईएम रुग्णालयात दाखर करण्यात आले होते. २ जुलै रोजी केईएममध्ये त्यांची करोना चाचणी करण्यात आली असता त्यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. 


त्यानंतर त्यांच्यावर कॅन्सरसाठी उपचारही सुरु होते. बुधवारी रात्री ९ वाजता त्यांने खिडकीच्या लोखंडी अँगलला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली. यावेळी खरात यांच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदवण्यात आला. खरात यांचे वडील जानू खरात यांनी दिलेल्या जबाबानुसार शहाजी हा कॅन्सर झाल्यामुळे डिप्रेशनमध्ये गेला होता. त्याला खूप नैराश्य आले होते. यातूनच त्याने बरेवाईट केले असावे, शक्यता त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.