कोरोनाला घाबरून लोकांनी आपले पाळीव प्राणी सोडू नये - राजेश टोपे
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ६४ वर गेली आहे.
मुंबई : सध्या देशात कोरोना कोरोना व्हायरसच्या वाढत्या फैलावामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. हा आजार प्राण्यांमुळे होत असल्याची समज नागरिकांमध्ये निर्माण होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांचे पाळीव प्राणी घराबाहेर सोडण्यास सुरूवात केली आहे. कोरोनाचा संसर्ग प्राण्यांपासून होत नसल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ६४ वर गेली आहे.
ते म्हणाले, 'कोरोना आजार होण्याच्या भितीने अनेकांनी आपल्याकडील पाळीव प्राणी सोडून देण्यास सुरूवात केली आहे. अशा तक्रारी हेल्पलाईनवर प्राप्त होत आहेत. पाळीव प्राण्यांपासून कोरोना संसर्ग झाल्याची कोणतीही उदाहरणे नाहीत. त्यामुळे लोकांनी घाबरून आपले पाळीव प्राणी सोडून देवू नये. ' असे आवाहन त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांना केले आहे.
दरम्यान, देशात सध्या कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. या धोकादायक विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्या म्हणजे रविवारी सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत 'स्वयंम संचारबंदी' करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. त्यांच्या या निर्णयाला सर्वच स्थरांतून प्रतिसाद मिळत आहे.