मुंबई: देशव्यापी लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक दिवसांपासून मद्यासाठी आसुसलेल्या तळीरामांना अखेर दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने सोमवारपासून दारुची दुकाने उघडण्याला सशर्त मंजुरी दिली आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत ही दुकाने सुरु राहतील. या पार्श्वभूमीवर आज मुंबईत वाईन शॉप उघडण्यापूर्वीच बाहेर दर्दींच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. पुण्यातही काहीसे असेच चित्र आहे. मुंबईच्या बोरिवली परिसरात मद्यशौकिनांनी वाईन शॉपबाहेर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत रांग लावल्याचे दिसून आले. लॉकडाऊनच्या काळात दारूची दुकाने बंद असल्याने या सगळ्यांचे वांदे झाले होते. मात्र, सरकारच्या निर्णयामुळे आजपासून या शौकिनांना दिलासा मिळणार आहे. मात्र, राज्य सरकाराकडून दारुची दुकाने सुरु ठेवण्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, राज्यातील दारुची दुकाने सुरु करायची की नाही, यावरुन आतापर्यंत बराच वाद झाला आहे. दारुची दुकाने सुरु केल्यास राज्य सरकारच्या तिजोरीत विनासायास महसूल जमा होईल, असे मत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले होते. मात्र, दारुच्या दुकानांवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणार नाही, असा आक्षेप घेत अनेकांनी या मागणीला विरोध केला होता.  

काय असतील मद्यविक्री करणाऱ्या दुकानांसाठीच्या अटी? 


*दुकानावर येणार्‍या नोकराची आणि ग्राहकांचीही थर्मल स्कॅनिंग करावी लागणार. 


*ज्यांना सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणं आहेत अशा ग्राहक, नोकरांना दुकानात प्रवेश देऊ नये. 


*दुकान आणि त्या सभोवतालच्या परिसराचं दर दोन तासांनी निर्जंतुकीकरण करावं. 


*ग्राहकांसाठी हॅन्ड सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावं. 


*सर्व दारूची दुकानं सुरू राहतील.


*शहरी भागात कंन्टेमेंट झोन वगळून इतर भागातील एकल दुकानं सुरू राहतील.