पाडव्यापासून मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी
राज्यातील मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी
मुंबई : पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. 'दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही.' असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नागरिकांना आवाहन केले आहे.
'राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच.' असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
'सर्वच प्रार्थनास्थळे बंदी असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने 'देव' पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता उद्याच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा.' असं ही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.