इंद्राणी मुखर्जीची घटस्फोटाची मागणी मान्य
...
मुंबई: शीना बोरा हत्याकांडाचा प्रमुख आरोपी पीटर मुखर्जीनं त्याची पत्नी आणि याच प्रकरणाची प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीनं मागितलेली घटस्फोटाची मागणी मान्य केलीय. घटस्फोटाच्या प्रक्रियेला आणखी काही महिन्यांचा वेळ लागणार असल्याचं इंद्राणी मुखर्जीच्या वकीलांनी सांगितलं आहे. एप्रिल महिन्यात इंद्राणी मुखर्जीनं पीटरपासून घटस्फोटाची मागणी केली होती. त्यावर पीटरच्या वकीलांनी नोटीसीला उत्तर देताना घटस्फोट घेण्यास हरकत नसल्याचं म्हटलंय.
कोण आहे इंद्राणी?
गुवाहाटीमध्ये वाढलेली परी नावाची साधी मुलगी मीडिया टायकून इंद्राणी मुखर्जी कशी बनली.. आपल्याच पोटच्या मुलीचा खून तिनं का केला... जाणून घ्या...
गुवाहाटीची परी बोरा
हत्या करणाऱ्या आईचं खरं नाव परी बोरा... गुवाहाटीच्या सुंदर नगरमध्ये ती लहानाची मोठी झाली. पण तिला आयुष्यात खूप मोठं व्हायचं होतं. त्यासाठी काहीही करायची तिची तयारी होती. १९८८ मध्ये वयाच्या १६ व्या वर्षीच ती कुणालाही न सांगता घरातून निघून गेली. १९९० मध्ये दोन वर्षांनी ती घरी परतली, तेव्हा तिला दोन मुलं झाली होती... शीना आणि मिखाईल...
सिद्धार्थ दाससोबत पहिलं लग्न
कुणा सिद्धार्थ दास नावाच्या त्रिपुरातल्या माणसाबरोबर तिचं लग्न झालं. सिद्धार्थचे चहाचे मळे होते. मात्र शीना आणि मिखाईल ही आपली मुलं आहेत, हे मानायला दास तयार नव्हता. त्यामुळंच या दोन मुलांची आडनावं तिनं बोरा अशीच ठेवली.
संजीव खन्नासोबत दुसरं लग्न
१९९०च्या सुमारास म्हणजे ती १८-१९ वर्षांची असताना संजीव खन्नाला भेटली. त्यांचं सूत जुळून आलं. मात्र तिनं पहिल्या लग्नाबद्दल आणि मुलांबद्दल काहीच सांगितलं नाही. १९९३ मध्ये तिनं संजीव खन्नाशी लग्न केलं. मात्र काही वर्षांतच त्यांचंही बिनसलं.
पीटर मुखर्जीसोबत तिसरं लग्न
२००२ मध्ये इंद्राणीच्या गळाला मोठा मासा लागला. पीटर मुखर्जी... स्टार टीव्हीचे तेव्हाचे सीईओ... दोघंही घटस्फोटीत. मात्र पहिल्या काही भेटीनंतरच त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. त्यावेळी ती INX नावाची एचआर कन्सल्टन्सी फर्म चालवत होती. २००७ मध्ये इंद्राणी आणि पीटरनं 9X मीडिया ही स्वतःची नवी कंपनी जन्माला घातली. ती कंपनीची सीईओ बनली आणि पीटर मुखर्जी चेअरमन... २०१० मध्ये 9X मीडियाचा फुगा फुटला.
पुन्हा दुसऱ्या पतीच्या संपर्कात
२०१० नंतर इंद्राणीच्या रेशीमगाठी पुन्हा दुसरा पती संजीव खन्ना याच्याशी जुळू लागल्या. पीटर मुखर्जीला या नातेसंबंधांची कल्पना नव्हती. मात्र तिच्या मुलीला शीना बोराला हे माहित असावं. शीना आणि तिचा सावत्र भाऊ राहुल मुखर्जी यांचे प्रेमसंबंध इंद्राणीला रूचत नव्हते. तर आपल्या प्रेमसंबंधांना आडकाठी आणल्यास इंद्राणी आणि खन्नाचे संबंध उघड करू, अशी धमकी शीनानं दिली होती. हे संबंध उघड झाले असते तर इंद्राणीला आपला नवरा पीटर, त्याची संपत्ती, अगदी पोटगीवर देखील पाणी सोडावं लागलं असतं. म्हणूनच की काय, तिनं शीनाचा काटा काढला, अशी शक्यता वर्तवली जातेय.