मुंबई : शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जीला मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. पीटर मुखर्जीला नोव्हेंबर २०१५ मध्ये अटक झाली होती. गेली चार वर्ष तो जेलमध्ये होता. शीना बोराची हत्या झाली तेव्हा तो परदेशात होता. त्यामुळे प्रथमदर्शनी हत्येतल्या सहभागाबाबत पुरावे नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने जामीन देताना सांगितले. पीटर मुखर्जी हा भारतातला नावाजलेला उद्योगपती आहे. त्याच्या अटकेने कॉर्पोरेट जगतात मोठी खळबळ माजली होती. शीना बोराची आई इंद्राणी मुखर्जी ही अजूनही जेलमध्ये आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शीना बोरा हत्याकांडात पीटरचा थेट सहभाग असल्याचे सबळ पुरावे तपास यंत्रणेकडे उपलब्ध नसल्याचे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने पीटर मुखर्जीला दोन लाखांचा जामीन मंजूर केला आहे. मात्र सीबीआयने याला जोरदार विरोध करत सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी वेळ मागितला असून या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्याची मागणी केली. जी मान्य करत न्यायालयाने या निर्णयाला सहा आठवड्यांची स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती नीतीन सांबरे यांनी गुरूवारी हा निकाल जाहीर केला.


याआधी अनेकदा पीटरने केलेल्या जामिनासाठीचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. काही महिन्यांपूर्वी वैद्यकीय कारणांसाठी मुंबई उच्च न्यायालयाने पीटरला तात्पूरता जामीन मंजूर केला होता. शीना बोरा हत्याकांड प्रकरणात अटकेत असलेल्या पीटर मुखर्जीचा हा सातवा जामीन अर्ज होता. विशेष सीबीआय न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर पीटरने उच्च न्यायालयात अर्ज केला होता. 



पीटर मुखर्जीला १६ मार्च २०१९ रोजी हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यानंतर न्यायालयाच्या संमतीने त्याला शस्त्रक्रियेसाठी खासगी रूग्णालयात हलवण्यात आले होते. तेव्हापासून पीटर मुखर्जीची प्रकृती काहीशी नाजूकच आहे.


शीना बोरा ही इंद्राणीची मुलगी असून तिची हत्या साल २०१२ मध्ये इंद्राणीने घडवून आणल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला आहे. या कटाची संपूर्ण माहिती इंद्राणीचा पती पीटर मुखर्जीलाही होती, असा सीबीआयचा आरोप आहे.