मुंबई : पेट्रोल-डिझेलचा समावेश वस्तू आणि सेवा करामध्ये करावा, अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. यासाठी जीएसटी काऊंसिलमध्ये प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असल्यामुळे पेट्रोल-डिझेल महाग होत असल्याचं त्यांनी मान्य केलंय. 


पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये आज पुन्हा एकदा वाढ झालीय. दरवाढीचा आजचा सलग अकरावा दिवस आहे. मुंबईसह राज्यभरात आज पेट्रोल १६ पैसे आणि डिझेल २० पैसे महाग झालंय. आज मुंबईत एक लीटर पेट्रोलसाठी ८६ रुपये ७२ पैसे  तर डिझेलसाठी ७५ रुपये ५४ पैसे मोजावे लागत आहेत. रत्नागिरीत आज ८७ रुपये ७८ पैसे तर नागपुरात पेट्रोलचा दर ८७ रुपये २८ पैसे तर पुण्यात ८६ रुपये ५८ पैसे मोजावे लागत आहेत.