देवेंद्र कोल्हटकर, झी २४ तास, मुंबई : स्वातंत्र्यदिन (Independence Day) अवघ्या काही तासांवर आला असतानाच मुंबई विमानतळाची (Mumbai Airport) सुरक्षा ऐरणीवर आलीये. कारण धावपट्टीवर (Runway) चक्क पेट्रोलच्या बाटल्या ((Petrol bottles) फेकण्याची घटना घडलीये. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या असून विमानतळाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. (Petrol bottles thrown on the runway at Mumbai airport)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं बिझी विमानतळ असलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. कारण रात्री काही अज्ञातांनी धावपट्टीवर चक्क पेट्रोलच्या बाटल्या फेकल्यात. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सावध झालीये. 



पेट्रोलच्या बाटल्या आढळून आल्यानंतर बॉम्बशोधक पथकानं विमानतळाची कसून तपासणी केली. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं विमानतळाची सुरक्षाही वाढवली आहे. विमानतळाला लागून असलेल्या गावदेवी झोपडपट्टीतून भिंतीवरून या पेट्रोलच्या बाटल्या फेकण्यात आल्या होत्या. त्यामुळे ही झोपडपट्टीही संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.  


या घटनेमुळे विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला नसला तरी यंत्रणा सावध झाल्या आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जैश किंवा लष्कर ए तोयबा या संघटना अतिरेकी हल्ला करू शकतात, असा इशारा गुप्तचरांनी दिलाय. त्यामुळे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, सगळीकडेच सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यातच मुंबई विमानतळासारख्या संवेदनशील ठिकाणी अशा पद्धतीनं पेट्रोलच्या बाटल्या सापडणं ही चिंतेची बाब आहे.