मुंबईच्या विमानतळावरील लँडिंग ठरतेय पायलटची डोकेदुखी
मुंबई विमानतळावर आत जाण्यासाठी आपल्याला अनेक सुरक्षा चाचण्या पार कराव्या लागतात. तसंच अपघातात बचाव कार्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा कार्यरत आहे. मात्र विमान उड्डाणाला सध्या वेगळाच धोका संभावतो आहे, ज्याची तक्रार वैमानिकांनी अनेक वेळा केली आहे. मात्र त्या समस्येवर तोडगा मात्र निघालेला नाही...
प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : मुंबई विमानतळावर आत जाण्यासाठी आपल्याला अनेक सुरक्षा चाचण्या पार कराव्या लागतात. तसंच अपघातात बचाव कार्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा कार्यरत आहे. मात्र विमान उड्डाणाला सध्या वेगळाच धोका संभावतो आहे, ज्याची तक्रार वैमानिकांनी अनेक वेळा केली आहे. मात्र त्या समस्येवर तोडगा मात्र निघालेला नाही...
मुंबई विमानतळ हे जगातलं सर्वात व्यस्त असं विमानतळ... दिवसभरात सुमारे ९२५ विमानांची ये जा मुंबई विमानतळावरून होते. या विमानतळाची सुरक्षाव्यवस्था सीआयएसएफकडे आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठीही अनेक यंत्रणा राबत असतात.
विमान जमिनीवर उतरल्यावर ५० सेकंदात धावपट्टी मोकळी करणं गरजेचं असतं. त्यासाठी टॅक्सी वेची रचना करण्यात आलीय. काही अपघात झाल्यास अत्याधुनिक अग्निशमन दल आहे. मुंबई अग्निशमन दलाचीही मदत घेतली जाते. भारतात पहिल्यांदाच आपात्कालीन शिडीही मुंबई विमानतळावर तैनात करण्यात आलीय. मात्र असं असलं तरी विमानतळ प्रशासन चिंतेत आहे.
विमानतळाशेजारी असलेल्या भारत मिल कंपाऊंड आणि इतर झोपडपट्ट्यांमुळे विमानाला पक्ष्यांची टक्कर होते. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे विमानतळावर पक्षी रोखण्यासाठी जाळी आणि पक्ष्यांना उडवून लावण्यासाठी मशीन आणि माणसांचा वापर केला जातो. मात्र विमानांचं उड्डाण होतेवेळी अथवा लँडिंगच्या वेळी प्रामुख्याने ड्रोन, पतंग, फुगे, पतंग कंदील आणि लेझर लाईटचाही वैमानिकांना त्रास होतो. यामुळे संपूर्ण विमानाची सुरक्षाच धोक्यात येते. मुंबईत ड्रोन उड्डाणावर बंदी आहे. मात्र लेझर लाईट अजून सुरूच आहेत.
घाटकोपर भागात विमान जेव्हा कमी उंचीवर येते तेव्हा खाली सुरू असलेल्या लग्न समारंभातल्या लेझर लाईटचा अडथळा निर्माण होतो. वैमानिकांनी वारंवार अशा तक्रारीही एटीसीकडे नोंदवल्या आहेत. विमानतळावर अद्ययावत यंत्रणा उपलब्ध आहेत. मात्र असे अपघात टाळण्यासाठी मुंबई पोलिसांकडूनही सहकार्याची अपेक्षा आहे. तसंच नागरिकांच्या मानसिकतेतही बदल होणं गरजेचं आहे.