पंतप्रधान मोदींची शिवरायांशी तुलना; भाजपा बॅकफूटवर?
भाजप नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या पुस्तकावरून महाराष्ट्रात चांगलाच वाद रंगला आहे.
मुंबई : भाजप नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या पुस्तकावरून महाराष्ट्रात चांगलाच वाद रंगला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन होत असताना भाजप या विषयी काहीसं बॅकफूटवर गेल्याचं दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्यानं सुरू झालेला वाद आता चांगलाच चिघळला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी महाराजांशी तुलनाच होऊ शकत नाही, असं महाराजांच्या वंशजांनी खडसावलं आहे. तर या मुद्यावरून राजकारण देखील तापलं आहे.
भाजप नेते जय भगवान गोयल यांच्या 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून सुरू झालेल्या वादाचा आता भडका उडालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना होऊ शकत नाही, अशी गर्जना भाजप समर्थक खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली. तर शिवरायांचे वंशज आणि भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनीही हे पुस्तक मागे घेण्याची मागणी केलीय.
दिल्लीत भाजपनं प्रकाशित झालेल्या या पुस्तकावरून आता महाराष्ट्रातल्या नेत्यांमध्ये घमासान सुरू झालंय. या पुस्तकाच्या निषेधार्थ सर्व राजेंनी आपल्या पदांचा राजीनामा द्यायला हवा अशी मागणी शिवसेनेच्या संजय राऊतांनी केली. तर राऊतांना राजीनामा मागण्याचा अधिकार नाही. त्यांनी जपून भाषा वापरावी, अशा इशारा शिवेंद्रराजेंनी दिला.
एवढा वाद पेटला असला तरी, पुस्तकाचे लेखक आणि भाजप नेते जय भगवान गोयल हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. तर वादग्रस्त पुस्तक मागे घेण्याचे संकेत भाजपकडून देण्यात आलेत.
आता भाजप हे पुस्तक मागे घेऊन वाद कधी संपवणार, याकडं तमाम शिवप्रेमींचं लक्ष लागलंय.