मुंबई : महाराष्ट्र कन्या कश्‍मिरा पवार आता पंतप्रधान कार्यालयातील राष्ट्रीय सल्लागार बनली आहे.  विशेष म्हणजे एमपीएससी परीक्षेतलं यश, तसेच 'सीबीआय'मधील अधीक्षकपदी निवड अशा चांगल्या संधी नाकारत, कश्मिराने आव्हानपूर्ण संधी स्वीकारली आहे.


साताऱ्यातील सर्वसामान्य कुटूंबातील मुलगी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेच तेच, न करता काही तरी आव्हानात्मक करण्यासाठी,  या २४ वर्षाच्या युवतीने मेक इन इंडिया, ग्रामीण विकास प्रकल्पांतर्गत, आपल्या कामगिरीची चुणूक दाखवून दिली आहे. याचीच दखल घेतल्याने यापुढे ती ,आता विविध क्षेत्रांतील योजनांबाबत केंद्र सरकारला सल्ला देणार आहे.  कश्मिरा ही साताऱ्यातील सर्वसामान्य कुटूंबातील मुलगी आहे.


काही प्रकल्पांच्या स्पर्धा घेतल्या जातात


पंतप्रधान कार्यालयाच्या 'मेक इन इंडिया' प्रकल्पात कश्मिराने प्रथम क्रमांक मिळविला आहे. केंद्र सरकारच्या वतीने विविध क्षेत्रांतील विकासासाठी, काही प्रकल्पांच्या स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धेत कश्‍मिराने भाग घेतला, आणि यश मिळवले.


पंतप्रधान कार्यालयात राष्ट्रीय सल्लागार


विशेष म्हणजे कश्मिराची, एमपीएससी'मधून तिची उपजिल्हाधिकारी म्हणून नुकतीच निवडही झाली आहे आणि पंतप्रधान कार्यालयातून राष्ट्रीय सल्लागार म्हणूनही. तर दुसरीकडे ग्रामीण विकासाच्या प्रकल्पातून तिने सुचविलेल्या "स्मार्ट व्हिलेज'ची योजना उत्तर प्रदेशात राबविण्यास सुरवात झाली आहे.


 'सोशल असिस्टंट प्रोग्राम'ला पेटंट


'मेक इन इंडिया' आणि ग्रामीण विकास या दोन प्रकल्पांना राष्ट्रपती पुरस्कारही मिळाला आहे. कश्मिराने तयार केलेल्या 'सोशल असिस्टंट प्रोग्राम'ला पेटंट देऊन, ही योजना केंद्राच्या ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत राबविण्यास सुरवात करण्यात आली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील थेट संवाद साधतात


कश्मिराकडे साधुसुधी कामगिरी नाही, कश्मिराशी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील थेट संवाद साधतात. केंद्र सरकारच्या प्रकल्प स्पर्धेतील सहभागानंतर गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीपासून पंतप्रधान कार्यालयातील मुख्य सचिव नृपेन मिश्रा तसेच सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, श्रीकर परदेशी अशा प्रमुख अधिकाऱ्यांच्या संपर्कात कश्‍मिरा असते. 


पत्रव्यवहारावर 'कश्‍मिरा पवार, महाराष्ट्र' एवढाच पत्ता


केंद्राकडून तिच्यासाठी होणाऱ्या पत्रव्यवहारावर 'कश्‍मिरा पवार, महाराष्ट्र' एवढाच पत्ता असतो. तेवढ्या पत्त्यावर तिचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कश्मिराला पोहोचविले जाते. साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ती या अधिकाऱ्यांशी वेगवेगळ्या आणि नवनवीन विषयांवर ती संवाद साधते.


पंतप्रधान कार्यालयातील टीममध्ये कार्यरत


चीनच्या अनुषंगाने डोकलामबाबत तिने व्यक्त केलेल्या मतांवर आधारित केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेतील प्रश्‍नांना उत्तरे दिली आहेत. डोवाल व मिश्रा हे अधिकारी विविध विषयांची मांडणी करताना कश्‍मिराच्या नावाचा उल्लेख तिने व्यक्त केलेल्या मतांसह करतात. आतापर्यंत साताऱ्यात राहून ती सल्ला देत होती, आता पंतप्रधान कार्यालयातील टीममध्ये राहून ती यापुढे कार्यरत राहणार आहे. 


ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी क्षमता


कश्मिराचे वडील संदीप हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात नोकरी करतात, तर आई मेघा रयत शिक्षण संस्थेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्राचार्या आहे.  ग्रामीण भागातील युवक घरी राहूनही अभ्यास आणि अनुभवाच्या जोरावर , कोणत्याही क्षेत्रात भरारी मारू शकतात, हे काश्मिराने मिळवलेल्या यशावरून दिसून येत आहे.


कोणत्याही प्रकारचा क्‍लास न लावता


साताऱ्यात घरी राहूनही निर्धार आणि अभ्यासपूर्वक पुढे जाता येते. कोणत्याही प्रकारचा क्‍लास न लावता घरीच अभ्यास केल्याचे ती सांगते.  केवळ अभ्यासच नव्हे, तर ती ऍथलेटिक्‍समध्ये राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरची खेळाडूही आहे. 


आंतरशालेय वादविवाद स्पर्धेतील ती विजेती


भरतनाट्यमच्याही तीन परीक्षा तिने दिल्या आहेत. आंतरशालेय वादविवाद स्पर्धेतील ती विजेती आहे.  आई-वडिलांची एकुलती एक कन्या आता तिच्या कर्तृत्वाने महाराष्ट्राची आणि भारताची कन्या बनणार आहे. 


नागरी सेवेसाठी काम करू इच्छिणाऱ्यांना मार्गदर्शन


अकरावी, बारावीला शास्त्र शाखेचा अभ्यास करणाऱ्या कश्‍मिराने नंतर येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये कला शाखेत प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये तिने 'स्टुडंट ऑफ द ईअर' किताब मिळविला. 


सोशिओलॉजी विषयामधून एम.ए. करताना ती शिवाजी विद्यापीठात टॉपर ठरली. विद्यापीठाच्या एकांकिका स्पर्धेत तिने यश मिळविले.  नागरी सेवेसाठी काम करू इच्छिणाऱ्या कला शाखेतील विद्यार्थ्यांना ती मार्गदर्शन करते.