जॉय थॉमस नाही तर जुनेद; पीएमसी बँकेच्या संचालकाबाबत धक्कादायक माहिती
पीएमसी बँकेचा कार्यकारी संचालक जॉय थॉमसबाबत आणखी एक माहिती समोर आली आहे.
मुंबई : पीएमसी बँकेचा कार्यकारी संचालक जॉय थॉमसबाबत आणखी एक माहिती समोर आली आहे. दुसरं लग्न करण्यासाठी त्यानं मुस्लिम धर्म स्वीकारला होता. जुनेद नाव स्वीकारुन जॉय थॉमसनं आपल्या जुन्या सहकारीसोबत लग्न केलं होतं.
जॉय थॉमसला पहिल्या बायकोपासून एक मुलगा आहे. धक्कादायक बाब म्हणजे पुण्यात त्याच्या आणि दुसऱ्या बायकोच्या नावानं १० मालमत्ता आहेत. त्यात ९ फ्लॅट आणि एक बॅंक्वेट हॉल आहे. त्यासाठी त्यानं जुनेद नावाचा वापर केल्याचं स्पष्ट झालं आहे.
पुण्यातल्या ९ फ्लॅटपैकी एका फ्लॅटमध्ये दुसरी बायको राहते तर इतर फ्लॅट भाड्यानं दिलेत. हे सगळे फ्लॅट २०१२ नंतर विकत घेतलेले आहेत. म्हणजेच या गैरव्यवहाराला सुरुवात झाल्यानंतर विकत घेतल्याचं दिसून येतं आहे. जॉय थॉमस जुनेद नाव केवळ मालमत्ता खरेदी करताना वापरत असे. ऑक्टोबरच्या सुरुवातीलच त्याची सर्व खाती गोठवण्यात आली आहेत. जॉयच्या पहिल्या बायकोनं घटस्फोटासाठी आधीच ठाणे न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या तिन्ही आरोपींची पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे. आज तिन्ही आरोपींची पोलीस कोठडीसंपल्यामुळे या तिघांनाही मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करून १६ तारखेपर्यंत वाढवण्यात आली आहे.
पीएमसी खातेधारकांनी सुनावणीच्यावेळी न्यायालयाबाहेर जोरदार निदर्शनं केली. आरोपींवर कडक कारवाई करावी आणि आमचे पैसे लवकरात लवकर मिळावेत अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.