महिलांना फोन करुन अश्लील भाषेत बोलणाऱ्या विकृताला अटक
असा मिळवत होता महिलांचा आणि तरुणींचा नंबर
मुंबई : वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांनी एका विकृताला अटक केली आहे. अनेक महिलांना फोन करून अश्लील भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न हा तरुण करत होता. तसेच महिलांना जीवे मारण्याची धमकी ही देत होता. महिला आणि तरुणींना फोन करण्यासाठी हा आरोपी वेगवेगळ्या फोन नंबरचा वापर करत होता. त्यामुळे नेमका हा आरोपी कोण आहे याचा तपास लागत नव्हता. पण मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर तिने पोलिसात धाव घेतली आणि वडाळा ट्रक टर्मिनस येथे तक्रार देत गुन्हा नोंदवला. आरोपी हा दुसऱ्या राज्यात असल्याचे पोलिसांना तपासात लक्षात आले. त्यामुळे त्याचा शोध घेणे कठीण होते.
पोलिसांनी अधिक तपास करीत विजयकुमार उमाशंकर गुप्ता या 35 वर्षीय आरोपीला हरियाणा येथून अटक केली. आरोपी हा सुरक्षा रक्षकांचे काम करायचा आणि इमारतीत भेट देणाऱ्या नागरिकांची नावं, मोबाईल नंबर जमा करायचा आणि त्यानंतर विविध मोबाईल नंबर हुन मुलींना अश्लील भाषेत संभाषण करायचा.
अखेर या विकृताला पोलिसांनी अटक केली असून त्याने आता पर्यंत अनेक महिलांना असेच फोन करुन त्रास दिल्याचं लक्षात आलं आहे. त्याच्याकडून दोन मोबाईल फोन आणि विविध कंपन्यांचे 6 सिमकार्ड तसेच अनेक महिलांचे मोबाईल क्रमांक पोलिसांनी जमा केले आहेत.