प्रशांत अंकुशराव, झी मीडिया मुंबईः  मुंबईतील चारकोप पोलिसांनी अशा एका दुचाकी चोराला अटक केली आहे, जो महागडी बाईक पाहिल्यानंतर प्रथम गाडीची ट्रायल मागायचा नंतर ती दुचाकी  घेऊन पसार व्हायचा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपीला महागडी दुचाकी दिसली की तो दुचाकी स्वाराला थांबवायचा. गाडीचे आणि त्याचे कौतुक करायचा नंतर ती महागडी दुचाकीची ट्रायल मागायचा आणि ती महागडी आलिशान दुचाकी घेऊन फरार व्हायचा. 


या प्रकरणात पोलिसांना तक्रार प्राप्त होताच गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे. चारकोप पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याने आतापर्यंत किती महागड्या दुचाकी चोरल्या आहेत, चोरलेल्या दुचाकीचे तो काय करतो तसंच त्यात आणखी किती जणांचा सहभाग आहे याचा तपास सुरू आहे. 


याप्रकरणी चारकोप पोलिसांनी चोरीच्या दोन दुचाकी जप्त केल्या असून त्यांची किंमत सुमारे 15 ते 20 लाख असल्याचे सांगण्यात येत आहे. 


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जुबेर इरफान सय्यद असे आरोपीचे नाव असून तो 24 वर्षांचा आहे हा आरोपी हैदराबादचा रहिवासी असून मुंबईतील एका हॉटेलमध्ये राहतो. 


आरोपीविरुद्ध मुंबईतील चारकोप वांद्रे आणि ओशिवरा येथेही आलिशान महागड्या दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. 


पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने चोरीचे कारण सांगितले की त्याला महागड्या आणि आलिशान दुचाकी चालवण्याचा शौक आहे आणि हा शौक पूर्ण करण्यासाठी तो महागड्या आणि आलिशान दुचाकी चोरायचा. 


या प्रकरणाचा तपास मुंबईतील चारकोप पोलीस ठाणे करत असून त्याचे कोणी साथीदार आहेत का? आणि अजून त्याने किती गाड्या चोरल्या आहेत याचा तपास करत आहेत.