मुंबई : मुंबईतील धारावी येथे सुरु असणाऱ्या विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण मिळालं आहे. इथं शिक्षणमंत्र्यांच्या घराबाहेर हजारो विद्यार्थी जमले असता तिथं लाठीचार्ज करण्यात आल्याची माहिती समोर आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बरंच शिक्षण ऑनलाईन झाल्यामुळं परीक्षाही ऑनलाईनच असाव्यात अशी या विद्यार्थ्यांची मागणी होती. पण, या आंदोलनाला आता हिंसक वळण मिळाल्यानं नवा वाद उभा राहिला आहे.



शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर झालेल्या या घटनेचा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. 


नेमकं काय घडलं? 
एका व्हायरल मेसेजनंतर अनेक दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये याची कुजबूज सुरु झाली. ज्यानंतर अनेक विद्यार्थी धारावीमध्ये एकत्र आले. इथे हजारोंच्या संख्येने आलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी परत जाण्यास सांगितलं. 


पण, असं झालं नाही. अखेर पोलिसांनी बळाचा वापर केला. धारावी सारख्या ठिकाणी इतक्या संख्येनं विद्यार्थी शिक्षण मंत्र्यांच्या घराबाहेर एकत्र येण्याची ही घटना तणावाची परिस्थिती उदभवून गेली आहे. 


पोलिसांनी जमावाला पांगवलं असलं तरीही इथं बळाचा वापर केल्यामुळं आता संमिश्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. 


विरोधक सत्ताधाऱ्यांवर संतापले... 


विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या घटनेचा संदर्भ देत राज्यात हिटलरशाही सुरु असल्याचा हल्लाबोल दरेकर यांनी केला. 


परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्यासाठी हे आंदोलन विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं असता शिक्षणमंत्र्याच्या घराबाहेर जमलेल्या या विद्यार्थांवर लाठीचार्ज करण्यात आला. 


विरोधात जाणाऱ्या प्रत्येकाला सरकारकडून मिळणारी ही वागणूक पाहता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना निशाण्यावर घेतल्याचं पाहायला मिळत आहे. 


शाळा आणि कॉलेजं ऑनलाईन घेणार असाल, तर परीक्षा ऑफलाईन का ? या मुद्द्यावरून परीक्षा ऑनलाईन झाल्या पाहिजेत असा आग्रही सूर येथे विद्यार्थ्यांनी आळवला. 


एका सोशल मीडिया अकाऊंटवरून मेसेज आले आणि या आंदोलनाची सुरुवात झाल्याची माहिती उघड झाली. पण, विद्यार्थ्यांना कोणी चिथवतंय का हा प्रश्नही इथे उपस्थित होत आहे. 


पण, विद्यार्थ्यांना कोणीही चिथावणी देत नसून हा त्यांच्या भविष्याच्या आणि जिव्हाळ्याचा विषय असल्याचं वक्तव्य दरेकर यांनी झी 24 तासशी संवाद साधताना केलं.