राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल
विवेक फणसाळकर यांच्यावर ठाणे पोलीस आयुक्तालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मुंबई: राज्याच्या पोलीस खात्यात मोठे फेरबदल करण्यात आले असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह तब्बल १२० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. हायप्रोफाईल मानल्या जाणाऱ्या ठाण्याचे पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली आहे.
परमबीर सिंग आता राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था म्हणून जबाबदारी सांभाळतील. त्यांच्या जागी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रभारी महासंचालक विवेक फणसाळकर यांच्यावर ठाणे पोलीस आयुक्तालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांचीदेखील बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी राज्य सीआयडीचे प्रमुख संजय कुमार यांची वर्णी लागली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशन यांना पुण्याचा कार्यभार देण्यात आला आहे.
तर अतिरिक्त पोलीस महासंचालक भूषण कुमार हे नवे नागपूर पोलीस आयुक्त असतील. गृह विभागाच्या मुख्य सचिवपदी असलेले रजनिश सेठ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.