अजित मांढरे, मुंबई : दीड दिवसांच्या पाच दिवसांच्या आणि ७ दिवसांच्या गणपती बप्पाच्या विसर्जनानंतर आता ख-या अर्थाने मुंबई पोलिसांची जबाबदारी आहे ती शांततेत अनंतचतुर्दशी दिवशी गणेश विसर्जनाची. लाखो भाविक आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी रस्त्यावर उतरतात. त्यामुळे पोलिसांसमोर गर्दी नियंत्रणाचं आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणेश विसर्जनाकरता मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आहे. जल, थल आणि वायू तीन स्तरावर मुंबईच्या सुरक्षेवर लक्ष आहे. ठिकठिकाणी स्नायपर्सही तैनात करण्यात आले आहेत. मुंबई पोलीस सर्व भाविकांचे चित्रीकरण करणार आहेत.


मुंबई ही नेहमीच दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असते. गणपती विसर्जनाच्या दिवशी लाखो लोकं मुंबईतल्या विसर्जन स्थळी असतात. या गर्दीचा फायदा दहशतवाद्यांना घेवू नये याकरता मुंबई पोलीसांनी यंदाही जल, थल आणि वायू अशा तीन स्तरावर सुरक्षा व्यवस्थेचा प्लॅन आखलाय. विसर्जन स्थळी पोलीसांनी व़ॉच टॉवर उभे केलेत. तसंच शहरात जागोजागी सीसीटीव्ही लावण्यात आलेत. विसर्जनस्थळी येणारी प्रत्येक व्यक्ती कॅमे-यात कैद केली जाणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठीही विशेष दलं तैनात आहेत. पोलीस प्रथमच एका विशिष्ट पोलीस व्हॅनचा वापर करणार आहेत.  


अनंत चतुर्दशी म्हणजे मुंबई पोलिसांकरता एक आव्हानात्मक दिवस असतो. त्यामुळे या दिवशी स्वत: पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर ठिकठिकाणी पाहणी करणार आहेत. एकूण ४५ हजारपेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आणि अधिकारी तैनात असणार आहेत. विसर्जन स्थळांच्या भोवती असलेल्या उंच इमारतींवर स्नायपर्स तैनात असणार आहेत. यावर्षी २५ जणांची ड्रोन टीम तयार केली गेली आहे. समुद्रमार्गे संकट येऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी कोस्ट गार्ड आणि नेव्हीच्या मदतीने सुरक्षा व्यवस्था मजबूत केली आहे.


पोलिसांनी मुंबई सुरक्षित राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. मात्र पोलिसांना नागरिकांनीही सहकार्य करण्याची गरज आहे. सणांच्या उत्साहात सुरक्षेशी तडजोड होऊ न देण्याची जबाबदारी नागरिकांनी आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगली तर अनेक संकटांचा सामना करता येतो.