मनसेतून सेनेत गेलेल्या नगरसेवकांना संरक्षण
सहाही नगसेवकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांना पोलीस संरक्षण पुरवण्यात आले आहे.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ६ नगरसेवकांनी मनसेला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनतर मोठा वादंग निर्माण झाला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या घरासमोर गर्दी केली आणि आपण 'त्या' नगरसेवकांसोबत नसल्याचे दाखवून दिले. तसेच बंड केलेल्या नगरसेवकांविरुद्ध आवाज उठविला. त्यामूळे सहाही नगसेवकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांना पोलीस संरक्षण पुरवण्यात आले आहे.
नाराज झालेल्या मनसे कार्यकर्त्यांकडून काही अघटीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शिवसेनेते गेलेल्या ६ नगरसेकांच्या घरांना आणि कुटुंबियांना पोलीस संरक्षण दिलं आहे. दरम्यान सर्व नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवण्यात आल्याची माहितीही देण्यात आली आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र अद्याप यावर प्रतिक्रिया आलेली नाही.
मुंबई महापालिकेत सध्या शिवसेनेची सत्ता असली तरी शिवसेना आणि भाजप यांच्या संख्याबळात केवळ एकच जागेचा फरक होता. भांडूपमधील पोटनिवडणुकीत काल भाजपची नगरसेविका विजयी झाल्यानं भाजपचं संख्याबळ ८३ वर पोहोचले तर सत्ताधारी शिवसेनेचे ८४ नगरसेवक होते.
‘आमच्या नगरसेवकांना कशाचं प्रलोभन दिलंय हे तपासावं लागेल. तसेच त्यांना धमक्या दिल्या का? तेही बघावं लागेल. याप्रकरणी आमच्या नेत्यांनी कायदेशीर तक्रार केली आहे. हे सर्व नगरसेवक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इंजिनावर निवडून आले आहे. अशाप्रकारे पक्ष सोडून जाणे दुर्दैवी आहे. त्यांना जायचं होतंच तर पक्षाचा, पदाचा राजीनामा द्यायचा होता. निवडणूक लढायची होती’, अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली .