..म्हणून पोलिसांनी मानले रोहित शेट्टीचे आभार
कोरोना व्हायरसचा फैलाव दिवसागणिक झपाट्याने होताना दिसत आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसचा फैलाव दिवसागणिक झपाट्याने होताना दिसत आहे. आजच्या घडीला संपूर्ण देश कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी युद्ध पातळीवर मेहनत करत आहेत. या युद्धामध्ये डॉक्टर, पोलिस, नर्स, सफाई कामगार त्याचप्रमाणे आत्यावश्यक सेवेतील सर्व व्यक्ती घरापासून दूर देशाचं रक्षण करत आहेत. त्यामुळे या वास्तव हिरोंच्या मदतीसाठी बॉलिवूडकर मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. आता दिग्दर्शक रोहित शेट्टीने मदतीसाठी हात पुढे केला आहे. रोहितने मुंबईतील त्याचे ८ हॉटेल पोलिसांना वापरण्यासाठी दिले आहेत.
हे हॉटेल्स त्याने पोलिसांना फक्त वापरायला दिले नसून त्यांच्या जेवणाची आणि नाश्ट्याची सोय देखील त्याने केली आहे. त्यामुळे पोलिसांनी दिग्दर्शक रोहित शेट्टीचे ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले आहेत.
'या महामारीच्या काळात रोहित शेट्टीने जी माणूसकी दाखवली आहे ती कौतुकास्पद आहे.' शिवाय पोलिसांनी त्याचे आभार देखील मानले आहेत.
राज्यात कोरोना व्हायरस रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे. गेल्या 24 तासात राज्यात 552 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज राज्यात 19 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5218वर पोहचली आहे.