मुंबई: उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी नाकारल्याने स्थानिक शिवसैनिक प्रचंड नाराज झाले आहेत. शिवसेनेने उस्मानाबादमधून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली होती. यानंतर रवींद्र गायकवाड यांच्या समर्थकांनी सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा दिला होता. तसेच गायकवाड यांच्या एका समर्थकानं अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्नही केला होता. मात्र, या इशाऱ्याची नेतृत्वाने दखल न घेतल्यामुळे रवींद्र गायकवाड यांचे समर्थक शनिवारी रात्री बसमधून मातोश्रीवर आंदोलन करण्यासाठी निघाले होते. मातोश्रीवर पोहोचल्यानंतर हे कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामे देणार होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेने निंबाळकरांना उमेदवारी दिल्याने खासदार गायकवाड समर्थक नाराज


ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांनी हे समर्थक मुंबईत पोहोचणार नाहीत, यादृष्टीने नाकाबंदी केली. नवी मुंबईच्या वाशी टोलनाक्यावर रविवारी सकाळी पोहोचलेल्या गायकवाड समर्थकांच्या बसेस पोलिसांनी अडवल्या. आल्या पावली परत जा अन्यथा तुमच्यावर गुन्हे दाखल करू, असा दम यावेळी पोलिसांकडून कार्यकर्त्यांना देण्यात आला. त्यामुळे हे शिवसैनिक कमालीचे नाराज झाले आहेत. पोलिसांनी इशारा देऊनही हे कार्यकर्ते ऐकायला तयार नव्हते. तेव्हा पोलिसांनी काहीजणांना ताब्यातही घेतले. त्यानंतर उर्वरित कार्यकर्ते ट्रेन पकडून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. तत्पूर्वी पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री तुळजापूर येथेही रवींद्र गायकवाड यांच्या काही समर्थकांना अडवले होते. मात्र, तरीही हे कार्यकर्ते मिळेल त्या वाहनाने पुढच्या प्रवासाला निघाले होते.


दरम्यान, आता उर्वरित शिवसैनिक मातोश्रीवर पोहोचल्यानंतर त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जाणार का? तसेच उद्धव ठाकरे यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.