पूजा चव्हाण प्रकरण भोवले, अखेर मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा
पूजा चव्हाण प्रकरणी (Pooja Chavan case) राज्याचे वनमंत्री संजय राठोड (Forest Minister Sanjay Rathod) यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
मुंबई : पूजा चव्हाण प्रकरणी (Pooja Chavan case) राज्याचे वनमंत्री संजय राठोड (Forest Minister Sanjay Rathod) यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्ष भाजपने (BJP) लावून धरली होती. तसेच संजय राठोड ( Sanjay Rathod) प्रकरणी महाविकास आघाडी सरकारही अडचणीत सापडले होते. विरोधकांकडून सात्याने आरोप करण्यात येत होता. महिला अत्याचार प्रकरणी सरकार गंभीर नाही, असा थेट हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
राज्याचे वादग्रस्त वनमंत्री संजय राठोड राजीनामा देणार का, याच्यावर जोरदार चर्चा सुरु होती. अधिवेशनापूर्वी राठोड राजीनामा देतील अशी शक्यता होती, ती खरी ठरली आहे. उद्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे आजच संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत हालचाली सुरु होत्या. संजय राठोड वर्षा निवासस्थानी गेलेत. तसेच संजय राठोड आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राठोड आज राजीनामा देणार अशी चर्चा होती. दरम्यान, राठोड यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांवर प्रचंड दबाव आहे. त्याआधी संजय राठोड यांनी आजच राजीनामा द्यावा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानंतर राजीनाम्याबाबत हालचाली सुरु झाल्या. अखेर संजय राठोड यांनी आपल्या वनमंत्री पदाचा राजीनामा दिला.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करत संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर अप्रत्यक्षपणे भाष्य केले आहे. 'सिंहासनाधिष्ठित छत्रपती शिवरायांच्या हातातील हा राजदंड काय सांगतो? महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन' असे लिहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ट्विट केला आहे. त्यामुळे या ट्विटवरून संजय राऊत यांनी संजय राठोड यांना एकप्रकारचा इशारा दिल्याचे म्हटले जात आहे. तर औरंगाबादमध्ये बोलताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कुणाचाही दबाव नसल्याचं म्हटले आहे.
एकीकडे संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांकडून दबाव वाढत असाताना दुसरीकडे राठोड यांचा राजीनामा घेऊ नये यासाठी बंजारा समाजातील महंत दबाव टाकत होते. संजय राठोड यांचा राजीनामा तडकाफडकी घेतला जाऊ नये, अशी विनंती पोहरादेवीच्या महंतांनी केली होती. महंत जितेंद्र महाराज यांनी 'झी 24 तास'शी बोलताना ही विनंती केली होती. राठोड यांचा राजीनामा घेण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी चर्चा करावी, असे आवाहन महंतांकडून करण्यात आले होते. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आधी चौकशी होऊ द्या. दोषी आढळून येईपर्यंत त्यांचा राजीनामा घेऊ नका, असे पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराज यांनी म्हटले होते.