मुंबई : कोरेगाव भीमा दंगलीच्या चौकशीला आता नवं वळण लागलं आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यात जातीनं लक्ष घातलं आहे. यामागं खरंच शहरी नक्षलवाद होता का, याचाही नव्यानं तपास होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सगळ्या प्रश्नांची लवकरच नव्यानं उत्तरं मिळणार आहेत. कारण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संपूर्ण प्रकरणाचा नव्यानं तपास करण्याचे संकेत दिले आहेत. कोरेगाव भीमा दंगलीमागं पुण्यात एल्गार परिषद आयोजित करणाऱ्या शहरी नक्षलींचा हात होता. या शहरी नक्षलींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच हत्येचा कट रचला होता, असा आरोप पुणे पोलिसांनी ठेवला आहे. पुणे पोलिसांच्या या तपासावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.


वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही शहरी नक्षल संकल्पनेवर जोरदार आक्षेप घेतले आहेत. नवं सरकार त्यात दुरुस्ती करेल, अशी त्यांची अपेक्षा आहे.


शहरी नक्षली ही संकल्पना तत्कालिन भाजप सरकारच्या नेतृत्वानं पुणे पोलिसांवर लादली होती का? याचं उत्तर नवं सरकार शोधणार आहे. यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकाही तपासातून स्पष्ट होणार आहेत.