मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी शक्यता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळांनी व्यक्त केली आहे. नवीन मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत निर्णयाचा अधिकार हा मुख्यमंत्री यांचा असल्याचंही भुजबळ यांनी म्हटलं आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला कोणतं आणि कोणाला मंत्रिपद मिळणार याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार येऊन दहा दिवस उलटले आहेत. तरी सरकारचा कारभार अद्याप सुरळीत सुरू झालेला नाही. खातेवाटप न झाल्यामुळे बिनखात्याचे मंत्री म्हणून बसण्याची वेळ सहा मंत्र्यांवर आली आहे. दुसरीकडे कार्यालयीन स्टाफविनाच मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांना काम करावं लागतं आहे.


मुख्यमंत्र्यांबरोबर शपथ घेतलेल्या सहा मंत्र्यांना देखील अद्याप खात्यांचं वाटप झालेलं नाही. त्यांच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नेमणुकाही रखडल्या आहेत.


आचारसंहिता आणि सरकार स्थापन करण्यास झालेला विलंब यात सव्वा दोन महिन्यांचा कालावधी गेला आहे. या काळातील अनेक फाईल्स मंत्रालयात मंजूरीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यात अद्याप नव्या सरकारच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवातही झालेली नाही. त्यामुळे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात अडचणी आहेत. सध्या ठाकरे सरकार मागील सरकारच्या निर्णयांचा आढावा घेण्यात व्यस्त आहे. त्यामुळे प्रत्यक्ष सरकारच्या कामाला सुरुवात कधी होणार हा प्रश्न आहे. 


शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्यातही महत्वाच्या खात्यावरुन चढाओढ आहे. त्यामुळे खाते वाटप होण्यास उशीर होत असल्याचे बोलले जात आहे. त्यातच राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्येही महत्वाच्या खात्यावर डोळा आहे. त्यामुळे खाते वाटपाचा तिढा, असल्याची चर्चा आहे.