मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम पोहोचली आहे. राऊत यांच्या भांडुपच्या घरी इडीचे अधिकारी दाखल झालेत. त्यांच्या या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. सीआयएसएफ जवानांसह ईडीची टीम राऊतांच्या घरी दाखल झालीये. शिवसेनेच्या नेत्यांसोबत आता खासदार संजय राऊत देखील ईडीच्या रडावर आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. ईडीने पाठवलेल्या समन्सला उत्तर मिळत नसल्याने ईडीचं पथक त्यांच्या घरी पोहोचलं असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान पत्राचाळ प्रकरण काय आहे हे जाणून घेऊया.


पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरण


पत्राचाळ जमीन घोटाळा 1,034 कोटी रुपयांचा असल्याची माहिती आहे. मुंबईमधील गोरेगाव इथल्या पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. ईडीच्या म्हणण्याप्रमाणे, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचं काम देण्यात आलेलं. मात्र ही या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकल्याचा आरोप आहे.


प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 25 टक्के शेअर एचडीआयएलला विकल्याची माहिती आहे. यानंतर पुढील काही वर्षांमध्येध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले. 


संजय राऊतांना का पाठवले समन्स? 


ईडीने 1 फेब्रुवारी रोजी ईसीआयआर दाखल केली होती. त्यानंतर प्रवीण राऊत आणि त्यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्याशी संबंधित मालमत्तांवर एकूण 7 ठिकाणांवर छापेमारी केली होती. त्यानंतर 2 फेब्रुवारी रोजी प्रवीण राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. 


प्रवीण राऊत शिवसेना नेते संजय राऊतांचे निकटवर्तीय मानले जातात. त्याचप्रमाणे प्रवीण राऊतांचं नाव PMC घोटाळ्यातही आलं होतं. ज्याचा तपास सुरु आहे. याप्रकरणाच्या तपासादरम्यान प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी यांच्या बँक खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्या बँक खात्यात 55 लाख रुपये पाठवण्यात आलेत. ज्याचा वापर राऊत कुटुंबाने दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला होता. याप्रकरणी वर्षा आणि माधुरी यांचेही जबाब नोंदवण्यात आलेत. 


सुजित पाटकर आणि संजय राऊत यांची मुलगी वाईन ट्रेडिंगच्या फर्ममध्ये भागीदार असल्याची माहिती आहे. पाटकर यांच्या पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीने अलिबागमध्ये भागीदारीमध्ये जमीन खरेदी केल्याचंही उघडकीस आले. त्यामुळेच संजय राऊत यांना ईडीनं समन्स बजाण्यात आले.