`रेकॉर्डिंगसाठी शक्तीशाली यंत्रणेचा वापर झाल्याची शक्यता`; फडणवीसांच्या व्हिडीओबॉम्बनंतर शरद पवार यांची प्रतिक्रीया
Sharad pawar on devendra fadnavis | काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांबाबत कट कारस्थान रचत असल्याचे व्हिडीओ विधानसभेत ठेवले होते. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : 'महाविकास आघाडी सरकार स्थिर असल्याने देवेंद्र फडणवीस अस्वस्थ आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये मला एका गोष्टीचं कौतुक वाटलं की, एका सरकारी वकिलाच्या कार्यालयातील जवळपास 125 तासांचं रेकॉर्डिंग करण्यात ते यशस्वी झाले, ही कौतुकास्पद बाब आहे. 125 तास रेकॉर्डिंग करायचं म्हणजे किती दिवस रेकॉर्डिंग चाललं म्हणजे यासाठी शक्तीशाली यंत्रणा वापरली असल्याची शक्यता आहे. अशा यंत्रणा भारत सरकारकडे आहेत', असे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांबाबत कट कारस्थान रचत असल्याचे व्हिडीओ विधानसभेत ठेवले होते.
'या सर्व व्हिडीओबाबत राज्य सरकार पडताळणी करीत आहे. माझं देखील नाव प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या घेण्यात आलं आहे. माझं यासंबधी कोणाशी बोलणं झालेलं नाही. गेल्या काही महिन्यांपासून आमची तक्रार आहे की, कोण्याही व्यक्तीने तक्रार केली की, लोकप्रतिनिधींमागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावण्यात येतो. महाराष्ट्र आणि बंगालमध्ये ही प्रकरणं अधिक आहेत.
अनिल देशमुख यांनाही अनेक दिवसांपासून डांबून ठेवण्यात आले आहे. इतके दिवस चौकशी केंद्रीय यंत्रणांचा दुरूपयोग करून सुरू आहेत. एकट्या अनिल देशमुख यांच्या मित्र-नातलगांवर जवळपास विविध यंत्रणांकडून 90 वेळा छापे टाकण्यात आले.
यातून केंद्राच्या सत्तेचा पूर्णतः गैरवापर करणे, राज्यातील सत्ता अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे. हे संसदीय लोकशाहीला शोभणारे नाही'. अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली आहे.