मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस राज्यामध्ये पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता आहे. पुढच्या ४ ते ५ दिवसांमध्ये राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवला आहे. पुढच्या ४ ते ५ दिवसात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता असल्याचं ट्विट प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारपासून पावसाचा जोर वाढेल, तसंच घाट भागातही अतीमुसळधार पावसाची शक्यता असल्याचं कृष्णानंद होसाळीकर म्हणाले आहेत. 



मुंबईमध्ये ऑगस्ट महिना उजाडला तरी पाऊस कमी प्रमाणात झाला आहे. कमी पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधला जलसाठाही कमी झाला आहे. याचकारणामुळे मुंबई महापालिकेने २० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. 


जून आणि जुलै महिन्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला, त्यामुळे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त ३४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. हा जलसाठा जुलै २०१९ मध्‍ये ८५.६८ टक्‍के व जुलै २०१८ मध्‍ये ८३.३० टक्‍के होता.