राज्यात सत्ता मिळवल्यानंतर भाजपचं आता या 14 महापालिकांवर लक्ष
राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर आता भाजपने महापालिका निवडणुकांक़डे लक्ष केंद्रीत केले आहे.
मुंबई : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (Cm Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी (Deputy CM Devendra Fadnavis) विराजमान होत भाजपने राज्यात सत्ता काबीज केलीये. अडीच वर्षांनंतर महाविकासआघाडीचे (MVA) सरकार पडले. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखालील सरकारला एकनाथ शिंदे यांनी सुरुंग लावला आणि स्क्रीप्ट लिहिली ते देवेंद्र फडणवीस यांनी. शिंदे-फडणवीस एकत्र येण्याने राज्याच्या राजकारणाचे चित्र बदलले. त्याचा परिणाम आता होणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकांवर दिसणार आहे.
एकनाथ शिंदे (Eknath SHinde) यांच्यासोबत शिवसेनेचे 39 आमदार सहभागी झाल्याने मुंबईसह संपूर्ण राज्यात राजकीय चित्र बदलले आहे. त्याचा राजकीय फायदा आगामी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरार महापालिका निवडणुकीत भाजपला मिळेल, असे मानले जात आहे. त्याचवेळी शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीने आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेसह (BMC) इतर 14 नगरपालिका जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. राज्यात सत्तापरिवर्तन होताच मुंबई भाजपने ट्विट करून आपला इरादा व्यक्त केला आहे. भाजपने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'ये तो झांकी है, मुंबई महानगरपालिका अजून येणे बाकी आहे.'
मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेना-भाजपसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न बनली आहे. शिवसेनेला हटवून भाजपला मुंबई महापालिका काबीज करायची आहे. त्यासाठी त्यांनी फार पूर्वीपासून तयारी सुरू केली आहे. शिवसेनेची बीएमसीवर सलग 26 वर्षे सत्ता आहे, तर ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेची सत्ता होती. नवी मुंबईतील मागील निवडणूक राष्ट्रवादीने जिंकली होती, मात्र गणेश नाईक भाजपमध्ये गेल्यानंतर तेथे बरेच काही बदल झाले. वसई-विरार महापालिकेवर हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची वर्षानुवर्षे सत्ता आहे. उल्हासनगर पालिकेवर स्थानिक पक्षांचे वर्चस्व राहिले आहे.
बीएमसी निवडणूक गेम चेंजर ठरणार
बीएमसीची निवडणूक शिवसेना-भाजपसाठी गेम चेंजर ठरणार आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला महापालिकेच्या सत्तेतून हटवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. दुसरीकडे, एवढ्या धक्क्यांनंतरही शिवसेनेने बीएमसीतील सत्ता वाचवली, तर भाजपसाठी हा मोठा धक्का असेल. बीएमसी निवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये कांटे की टक्कर होण्याची शक्यता आहे. मात्र, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपचे पारडे जड झाले आहे.
बीएमसी निवडणुकीत शिवसेनेला मराठी मतदारांची सहानुभूती आणि विश्वास आहे. जर बीएमसी शिवसेनेच्या हातून गेली तर पुन्हा येणे कठीण होईल. दुसरीकडे भाजपला हिंदी भाषिक लोक आणि बीएमसीमध्ये सत्ता परिवर्तनासाठी मते मिळतील अशी अपेक्षा आहे.
शिवसेनेसमोर आव्हान
शिवसेनेच्या विरोधात बंड करणारे मुंबईतील पाच आमदार आहेत. त्यात भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव, मागाठाणेतून प्रकाश सुर्वे, कुर्ल्यातून मंगेश कुडाळकर, चांदिवलीतून दिलीप लांडे आणि शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या माहीममधून सदा सरवणकर यांचा समावेश आहे. यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव हे चार वेळा स्थायी समितीचे अध्यक्ष राहिले आहेत. या आमदारांचे निकटवर्तीय माजी नगरसेवक त्यांच्या संपर्कात आहेत.
बीएमसी निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर शिवसेनेचे अनेक आजी-माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. याचा फायदा भाजपला निवडणुकीत होणार आहे.
2017 च्या बीएमसी निवडणुकीत शिवसेना-भाजप आमनेसामने निवडणूक लढले होते. त्यानंतर शिवसेनेचे 84 आणि भाजपचे 82 नगरसेवक निवडून आले होते. दुसरीकडे काँग्रेसचे 31, राष्ट्रवादीचे 9, मनसेचे 7, सपाचे 6, एमआयएमचे 2 असे उमेदवार निवडून आले. सुमारे 46 हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेत 26 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. बीएमसी निवडणुकीपूर्वी ज्या पद्धतीने शिवसेनेत बंडखोरी सुरू झाली, त्यावरून मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेनेला कठीण जाणार असं दिसतंय.