मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी डिजे लावून पार्टी करण्याचा अनेकांनी प्लॅन केलाय. पण तुमच्या डिजे पार्टीला नोटीस येण्याची शक्यता आहे. कारण सिनेमांची जवळपास २५ लाख गाणी कॉपीराईटच्या कचाट्यात सापडली आहेत. थर्टी फर्स्टसाठी सोसायटीच्या आवारात किंवा गच्चीवर डिजे लावून पार्टी करण्याचा अनेकजण प्लान आखतात. अनेकांनी तशी तयारीही करुन ठेवली असेल. पण ही तयारी तुम्हाला भलतीच महागात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याच कारण म्हणजे, तुम्हाला 'पीपीएल' अर्थात 'फोनोग्राफिक परफॉर्मन्स'ची नोटीस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पार्टीनंतर तुम्हाला अनेक दिवस कोर्ट-कचेऱ्यांच्या फेऱ्या माराव्या लागण्याची शक्यता आहे. 


स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे १९४२ पासून 'पीपीएल'कडे २५ लाख गाण्यांचे कॉपीराईट आहेत. आता पंचवीस लाख गाणी म्हटल्यावर तुमच्या डिजेच्या पार्टीत त्यातल्या एखाद्या गाण्याचा समावेश असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


तुम्हाला पीपीएलच्या कॉपीराईटची गाणी सुरु ठेवायची असतील तर त्याची रितसर परवानगी घ्यावी लागेल. अन्यथा तुम्हाला कोर्टाची नोटीस येऊ शकते. 


नुकताच उच्च न्यायालयात 'पीपीएल'नं दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना पीपीएलचे कॉपीराईटचं असलेली गाणी चालवण्यासाठी परवानगी घ्यावीच लागेल असं सांगितलंय. 


कोर्टाच्या या आदेशाचं पालन होतंय की नाही हे पीपीएल पाहणार आहे. हॉटेल आणि ऑर्केस्टांवर पीपीएलची नजर राहणार आहे. पण सोसायट्यांच्या आवारातील पार्ट्या आणि इमारतींच्या टेरेसवरच्या पार्ट्याही पीपीएलच्या रडारवर आहेत. 


त्यामुळं आताच परवानगी घ्या अन्यथा पार्टीनंतर त्याची मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही.