मुंबई: मोदी सरकारची अवस्था ही घरातील वस्तू विकायला काढणाऱ्या दारुड्यासारखी झाली आहे, अशी जळजळीत टीका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सध्याच्या आर्थिक परिस्थितीवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांनी म्हटले की, सरकार चालवण्यासाठी सरासरी १३ लाख कोटी रुपये लागतात. मात्र, नवा अर्थसंकल्प सादर होईपर्यंत एवढी रक्कम सरकारी तिजोरीत जमेल की नाही, याबाबत शंका आहे. केंद्र सरकारला साधारण १२ लाख कोटीची तूट पडेल. दारुडा व्यक्ती घरातील वस्तू विकतो त्याप्रमाणे केंद्र सरकार मालमत्ता विकत सुटले आहे. सोन्याची अंडी देणारी कोंबडीच विकण्याचा सरकारचा डाव आहे. देशाच्या आर्थिक परिस्थितीवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी केंद्राकडून नागरिकत्व सुधारणा विधेयक (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC)यासारखे मुद्दे पुढे केले जात असल्याचा आरोपही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केला. 


तसेच अमेरिका-इराण युद्ध सुरु झाले तर देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला. याशिवाय, नोटबंदीच्या काळात परदेशातील भारतीय लोकांना सरकारने पैसे डिपॉझिट करण्यासाठी सूट दिली होती. याद्वारे किती पैसे बँकांमध्ये जमा झाले, याची माहिती सरकारने द्यावी, अशी मागणी यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केली. 


तत्पूर्वी प्रकाश आंबेडकर आज मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या गांधी शांती यात्रेतही सहभागी झाले होते. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली CAA, NRC आणि NPR  ला विरोध करण्यासाठी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथून ही शांती यात्रा काढण्यात आली होती.