मुंबई : देश पातळीवर राजकीय नेतृत्व नाही हे आता कोरोना व्हायरसच्या covid-19 पार्श्वभूमीवर दिसून आले आहे. तीच गत महाराष्ट्राची झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर निर्णय ढकलून मोकळे होतात. अशा निर्णयाचा आम्ही धिक्कार करतो, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयाचा समाचार घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात शाळा चालू करायच्या की नाही हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून अधांतरी होता. आज मात्र मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय जिल्हा पातळीवर ढकलून दिला. याचाच अर्थ यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता नाही. राजकीय नेतृत्व नाही, दूरदृष्टी नाही आणि बेभरवशावरती हे राज्य सोडून दिले आहे. ही अवस्था 'जाणता राजा'ची पण असल्याची खरमरीत टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. 


केंद्रात मोदी नेतृत्व करू शकत नाही ते निर्णय घेऊ शकत नाही, आपले निर्णय राज्यावर सोडून देतात आणि राज्यातले लोक जिल्ह्यावर निर्णय सोडून देतात. हे आजच्या निर्णयावरून दिसून आले. अशा निर्णयाचा आम्ही धिक्कार करतो. शासनाला आमची विनंती आहे की, शाळा सुरू करायच्या की नाही हा निर्णय लवकर घ्या, करायच्या नसतील तर तसे स्पष्ट सांगा, करायच्या असतील तर केव्हा करणार, याचे वेळापत्रक जाहीर करा, वेळापत्रक जाहीर करताना, जर-तरची भाषा वापरायची नाही, असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.


दरम्यान, राज्यातील शाळा कधी सुरू होणार याबाबत संभ्रम असताना शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत तयार केलेल्या आराखड्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली. यानुसार जुलै महिन्यापासून टप्प्याटप्याने प्रत्यक्ष शाळा सुरू होणार आहेत. 


शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता