दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई : राज्यातील शाळा कधी सुरू होणार याबाबत संभ्रम असताना शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत तयार केलेल्या आराखड्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली. यानुसार जुलै महिन्यापासून टप्प्याटप्याने प्रत्यक्ष शाळा सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर व्हिडिओकॉन्स्फरिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन आणि प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यास मान्यता दिली आहे.
ऑनलाईन शाळा 15 जूनपासून सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने यापूर्वीच घेतला होता. मात्र ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा भागांमध्ये प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचा आराखडा शिक्षण विभागाने आखला आहे. मात्र ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आहेत, त्या भागातील शाळा सुरू होणार नाहीत.
मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर शिक्षण विभाग काही अटी आणि शर्ती घालून राज्यातील शाळा लवकरच प्रत्यक्ष सुरू करण्याबाबत निर्णय काढणार आहे.
शिक्षण विभागाने तयार केलेल्या आराखड्यानुसार पुढील मार्गदर्शक तत्व जाहीर करण्यात आली आहेत.
राज्यात जुलै पासून टप्प्याटप्प्याने प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याची तयारी
शाळा सुरू करण्यापूर्वी एक महिना सदर गावात कोरोनाच्या एकही रुग्ण नसेल याची खात्री करून शाळा सुरू होणार
सरसकट शाळा सुरू होणार नाहीत
जिथे महिनाभरात एकही रुग्ण आढळला नाही तिथले नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग जुलैपासून सुरू करण्याची तयारी
सहावी ते आठवीचे वर्ग ऑगस्टपासून सुरू करण्याची तयारी
पहिली ते पाचवीचे वर्ग सप्टेंबरपासून सुरू करण्याची तयारी
अकरावीचे वर्ग दहावीचा निकाल लागल्यानंतर आधी प्रवेश प्रक्रिया होणार
ती पूर्ण झाल्यावर वर्ग सुरू करण्याची तयारी
विद्यार्थ्यांची गर्दी टाळण्यासाठी एक दिवस आड वर्ग भरवण्याचीही मुभा
शाळा सुरू करण्यापूर्वी त्यांनी सॅनिटायझेशन करणे बंधनकारक
प्रत्येक बेंचवर एकच विद्यार्थी बसवण्याची अट
शिक्षक, विद्यार्थ्यांना मास्क घालणं बंधनकारक
हे वेळापत्रक संभाव्य स्वरूपाचे असून स्थानिक परिस्थिती विचारत घेऊन त्याप्रमाणे शाळा सुरू करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.