मुंबई: भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर पलटवार केला आहे. प्रकाश आंबेडकर आपल्यामुळे खासदार झाले, असे विधान शरद पवारांनी केले होते. मात्र, आंबेडकरांनी पवारांचा हा दावा फेटाळून लावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांनी म्हटले की, १९९७-९८साली काँग्रेससमवेत समझोता झाला. तो तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांच्याबरोबर झाला होता. त्यामध्ये शरद पवारांचा कुठेही सहभाग नव्हता, असे आंबेडकरांनी स्पष्ट केले.  शरद पवार यांच्याशी आपले कधीच संबंध नव्हते. हा आपला अंतिम खुलासा आहे. यापुढे पवार काही बोलले तरी मी खुलासा करण्याच्या फंदात पडणार नाही, असेही आंबेडकर यांनी सांगितले. 


याशिवाय त्यांनी राफेल विमान खरेदी व्यवहारावरून भाजप सरकारवरही टीका केली. काँग्रेसच्या काळात एका राफेल विमानाची किंमत ७१२ कोटी रुपये होती ती भाजपने १६०० कोटी रुपये केली. विमानाची किंमत अचानक एवढी कशी वाढली, हा प्रश्न असल्याचे ते म्हणाले. राफेल विमान कायम 'रेडी टू यूज' ठेवण्याची किंमत एक लाख कोटी रुपयांवर जाणार आहे, अशी माहिती आपल्याला मिळाल्याचे त्यांनी सांगितले.