मुंबई: शिवसेना आणि भाजप यांच्यात युती होण्याच्यादृष्टीने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जदयू नेते आणि निवडणूक रणनीती तज्ज्ञ प्रशांत किशोर यांनी मंगळवारी मातोश्रीवर येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यात युती होण्याची शक्यता वाढली आहे. यावेळी शिवसेनेच्या सर्व खासदारांनाही मातोश्रीवर बोलवण्यात आले होते. तेव्हा प्रशांत किशोर यांनी या सगळ्यांशी संवाद साधल्याचे समजते. यानंतर राजकीय वर्तुळात शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा सुरू आहे. भाजपने शिवसेनेला गेल्या निवडणुकीपेक्षा एक जास्तीची जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. युती झाली तर जागा वाटपाचे सूत्र २५-२३ असे राहील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, प्रशांत किशोर यांच्या भेटीनंतर शिवसेनेने याविषयी अधिक बोलण्यास नकार दिला. प्रशांत किशोर हे रालोआ आघाडीतील घटकपक्षाचे नेते आहेत. या नात्यानेच त्यांनी उद्धव यांची भेट घेतली. ही राजकीय नव्हे तर सदिच्छा भेट होती, असे राऊत यांनी सांगितले. 




आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात युती होणार का, असा प्रश्न संपूर्ण राजकीय वर्तुळाला पडला आहे. त्यादृष्टीने गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची गुप्तपणे खलबतेही सुरू आहेत. मात्र, दोन्ही पक्षांचे नेते जाहीरपणे युतीबद्दल काहीच सांगायला तयार नाहीत. किंबहुना युती झाली नाही तरी आम्हाला फारसा फरक पडत नाही, अशा वल्गना दोन्ही बाजूंनी केल्या जात आहेत.