मुंबई: शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचं निशाण फडकवल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे हे विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का आहे. शिवसेनेनं तडकाफडकी एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून काढून टाकलं आहे. त्यांच्या जागी अजय चौधरी यांना गटनेतेपद दिलं आहे. यानंतर भाजपा नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आपलं मत मांडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"एकनाथ शिंदे  हे आनंद दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले सामाजिक व्यक्तिमत्त्व आहे. आज हा कट्टर शिवसैनिक, शिवसेनेसाठी खस्ता खाणारा जो नेता आहे ते आज अडगळीत पडले आहेत. एकनाथ शिंदे जणू काही आपल्या विरोधात काम करणार आहेत अशी भूमिका घेत विधानपरिषदेच्या निवडणुकीतसुद्धा त्यांना विश्वासात न घेता त्यांच्यावर संशय व्यक्त केला. ज्या लोकांनी रक्त सांडून शिवसेना वाढवली त्यांची ही अवस्था असेल तर तळागाळातील शिवसैनिकाने कोणाकडे अपेक्षेने पाहायचे. " असं ट्वीट विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलं आहे.



एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे हे सध्या या आमदारांसोबत सूरतच्या एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलवलेल्या बैठकीला पक्षाचे 55 पैकी 18 आमदार उपस्थित होते. शिवसेनेचे इतर आमदार आणि नेते काय निर्णय घेतात याकडे ही लक्ष लागून आहे. शिवसेनेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांनी जर पक्ष सोडला तर त्यांच्यासोबत अनेक आमदार आणि नेते पक्ष सोडू शकतात.