मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याने रेल्वेच्या सर्व खाजगी उद्धघोषकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आज सकाळ पासूनच सर्व रेल्वे स्थानकावर तिकीट तपासणीस आणि रेल्वे कर्मचारी उद्घोषणा करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कालच उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या रेल्वे उद्घोषक व्यंकटेश बाबू वेमुगुंटी यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.  ठेकेदार या खाजगी उद्घोषकांना पगार देत नसल्याने उद्घोषकांनी आंदोलन सुरू केलं आहे.


कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या रेल्वे उद्घोषकांना गेल्या ४ महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. कंत्राटी उद्घोषकांनी कंत्रादाराविरोधात बुधवारी रात्रीपासून काम बंद आंदोलन सुरु केले.


मध्य रेल्वेच्या ३५ पेक्षा जास्त रेल्वे स्थानकांवर कंत्राटी उद्घोषकांची नेमणूक केली गेली आहे. आधीच कमी पगार आणि तो ही ४ महिन्यांपासून मिळाला नसल्याने अखेर या उद्घोषकांचा ते असहन झालं. त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली.