खासगी कोचिंग क्लासेसवर लवकरच नियंत्रण
लातूर हा नवा पॅटर्न समोर आला आहे
मुंबई : लातूर हा नवा पॅटर्न समोर आला आहे, हे सर्व दुर्देवी असल्याचं मत आज शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी व्यक्त केलंय. खासगी क्लासेसच्या माध्यमातून शिक्षणाचं बाजारीकरण झाल्याचंही विनोद तावडेंनी म्हटलंय. या माध्यमातून पालक वर्गाचेही शोषण होत होते, आता ही लोकं एकमेकांच्या जीवावर उठली आहेत. या खाजगी क्लासेना नियंत्रण आणण्यासाठी कायदा किंवा नियम सरकार तयार करत आहे, याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असंही तावडेंनी स्पष्ट केलंय.
लातूरमध्ये स्टेप बाय स्टेप क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या हत्ये प्रकरणी आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली असून हत्येसाठी त्यांना २० लाखांची सुपारी देण्यात आली होती.
कुमार मॅथ्स क्लासेसचे प्रमुख चंदनकुमार शर्मा यांनी ही हत्येची सुपारी दिली होती. व्यावसायिक स्पर्धेतून ही हत्या करण्यात आली. चंदनकुमार शर्मा, करण, अमोल शेंडगे, महेशकुमार रेड्डी आणि शरद घुमे अशा पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून रिव्हॉल्वर आणि १३ काडतुसं जप्त करण्यात आली आहेत.
३६ तासात लातूर पोलिसांना या हत्येचा छडा लावण्यात यश आलं. रविवारी मध्यरात्री अविनाश चव्हाण यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
अविनाश चव्हाण यांची हत्या करण्यासाठी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी निलंगेकर पाटील यांचा एकेकाळी अंगरक्षक असलेल्या करण सिंहनं सुपारी घेतल्याचं पुढं आलंय. सध्या लातूरमध्ये वास्तवास असलेला करण सिंह हा शिरूर अनंतपाळ तालुक्यातील रहिवासी आहे. करण सिंह याला ही सुपारी देण्यात आली होती. विशेष बाब म्हणजे हा करणसिंग लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा खाजगी अंगरक्षक म्हणून अनेक दिवस काम करीत होता.
पालकमंत्र्यासोबत त्याचे अनेक फोटो हे आजही फेसबूकवर आहेत. या प्रकरणातील आरोपी असलेले महेशकुमार रेड्डी आणि शरद घुमे या दोन मध्यस्थांकडून साडे आठ लाख रुपयेही करणसिंहला देण्यात आले होते. त्यानंतर आपला साथीदार अमोल शेंडगेच्या मदतीनं करण सिंहनं अविनाश चव्हाणवर लातूरच्या शिवाजी शाळेजवळ गोळीबार केला. ज्यात अविनाश चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. करण सिंह याच्यासह पाच जणांना अटक करण्यात आलीय.