कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने बुधवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबईतील निवडक खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना व्हायरसवर (COVID 19) उपचार करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. तसेच कोरोनाची चाचणी करण्याची सोय काही खासगी लॅबोरेटरीमध्येही उपलब्ध करून देण्यात येईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी सरकारी अखत्यारित येणाऱ्या प्रमाणित प्रयोगशाळांमध्येच कोरोनाची चाचणी होत असे. मात्र, रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता राज्य सरकारने खासगी रुग्णालये आणि लॅबोरेटरीजची मदत घेण्याचे ठरवले आहे. IMCR ने ठरवून दिलेल्या निकषांनुसारच खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोनाच्या चाचण्या होतील. 



यासाठी बुधवारी संध्याकाळी खासगी रुग्णालये आणि लॅबोरेटरी चालकांना चर्चेसाठी मुंबई महानगरपालिकेत बोलावण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिली. सध्याच्या घडीला मुंबई आणि आसपासच्या परिसरातील कोरोनाच्या रुग्णांना उपचारासाठी केवळ कस्तुरबा रुग्णालयाचा पर्याय उपलब्ध आहे. पालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात कोरोनाच्या संशयित रुग्णांना क्वारंटाईन करण्याची सोय होती. मात्र, रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांमुळे अनेकजण याठिकाणी राहण्यास राजी नाहीत. परिणामी चांगली सुविधा उपलब्ध असणाऱ्या कस्तुरबा रुग्णालयावर मोठा भार येत आहे. येत्या काही दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची लक्षात घेता कस्तुरबा रुग्णालयाची सुविधा अपुरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून ही तातडीची पावले उचलण्यात आली आहेत.