घरां-घरातील प्लॅस्टिकपासून बनणार गार्डनमधील बेंच
प्लॅस्टिक वेस्टपासून अनेक वस्तू तयाक करण्यात येणार आहेत.
मुंबई : गेल्या कित्येक वर्षांपासून साचलेल्या प्लॅस्टिकने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. प्लॅस्टिकचे ढिगच्या-ढिग साचले आहेत. प्लॅस्टिक संपूर्ण पर्यावरणाला धोकादायक ठरत आहे. संशोधकांनुसार, १९५० नंतर ८.३ बिलियन टन प्लॅस्टिक उत्पन्न झालं आहे. एक दिवस हेच प्लॅस्टिक आपल्याला, पर्यावरणाला संपूर्णपणे नष्ट करण्याचं कारण ठरु शकत असल्याचा धोका आहे.
प्लॅस्टिकच्या अतिवापरचे धक्कादायक आकडे समोर येत असताना दुसरीकडे काहीशी दिलासादायक बाबही समोर येत आहे. काही व्यक्ती, संस्था प्लॅस्टिकच्या वापरावर गंभीरतेने विचार करुन या मुद्यावर काम करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर करण्यासाठी लोकांना जागरुक करण्याचं काम अशा संस्थांद्वारे करण्यात येत आहे.
मुंबईत राहणारे शिशिर जोशी यांची 'प्रोजेक्ट मुंबई' ही संस्था प्लॅस्टिकविरोधात काम करण्यासाठी पुढे आलेल्या संस्थांपैकी एक आहे. 'प्रोजेक्ट मुंबई' हा असा उपक्रम आहे, जो नागरिक, प्रशासन आणि खासगी संस्थांना एकत्र जोडून, सामान्य प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आणि नंतर शहरात याची अंमलबजावणी करण्यासाठी काम करतो.
'प्रोजेक्ट मुंबई'साठी शिशिर जोशी यांच्यासोबत सध्या ७ जणांची टीम कार्यरत आहे. 'प्रोजेक्ट मुंबई'कडून जल्लोश-क्लिन कोस्ट, म्युनिसिपल हॉस्पिटल प्रोजेक्ट, स्मायलिंग स्कूल प्रोजेक्ट, प्लॅस्टिक रिसायकलोथोन यांसारखे अभियान चालवण्यात आले आहेत.
२०१८ मध्ये सुरु करण्यात आलेल्या प्लॅस्टिक रिसायकलोथोन अभियानाला चांगलं यश मिळालं. पहिल्या वर्षी या अभियानात जवळपास ८० हजार लोकांनी प्लॅस्टिक वेस्ट डोनेट केलं होतं. तर या वर्षी या अभियानात सव्वा लाखाहून अधिक लोक जोडले गेले आहेत.
गेल्या वर्षी जमा करण्यात आलेल्या प्लॅस्टिक वेस्टला रिसायकल करुन 'प्रोजेक्ट मुंबई'ने यापासून पालिकेच्या गार्डनमध्ये बसण्यासाठी बेंच बनवले आहेत. यावर्षी देखील 'प्रोजेक्ट मुंबई'ने मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक जमा केलं आहे. या प्लॅस्टिकपासून ते रोज वापरात येणाऱ्या गरजेच्या गोष्टी पेन, कचऱ्याचे डब्बे, बेंच बनवण्याच्या योजनेवर काम करत आहेत.
जे लोक प्लॅस्टिक डोनेशनमध्ये सहभागी झाले आहेत त्या, सर्वांना 'प्रोजेक्ट मुंबई'ने कपड्याच्या पिशव्या दिल्या आहेत. बाजारात जाताना प्लॅस्टिक पिशवी न मागता कपड्याची पिशवी वापरण्यासाठई प्रेरित करणं हा यामागचा उद्देश आहे.
प्लॅस्टिक वापराविरोधात 'प्रोजेक्ट मुंबई'ला मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिक्रियेनंतर, आता ते दर महिन्याला घरां-घरांत जाऊन प्लॅस्टिक वेस्ट जमा करण्यासाठी अभियान सुरु करणार आहेत. मुंबईप्रमाणेच इतर शहरांतही अशा प्रकारे अभियान सुरु करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 'प्रोजेक्ट मुंबई' टीमशी जोडण्यासाठी त्यांच्या वेबसाईटला भेट देऊ शकता. अशाप्रकारचं अभियान तुमच्या शहरांतही सुरु करायचं असल्यास 'प्रोजेक्ट मुंबई'शी info@projectmumbai.org संपर्क करता येऊ शकतो.