Buying a new home : नवं घर खरेदी केल्यानंतर त्या घरासाठीच्या कादगपत्रांपासून आर्थिक पाठबळापर्यंतची जुळवाजुळव आणि त्यानंतर घर नावावर होण्यापर्यंतची प्रक्रिया बरीच मोठी असते. मोठी असण्यापेक्षा या प्रक्रियेमध्ये अनेक टप्पे असे येतात जेव्हा हे सर्व कधी संपणार? हाच प्रश्न आपल्या मनात घर करू लागतो. ही पावती, ती पावती, अमुक दाखला, तमुक व्यक्तीच्या सह्या, विविध कर अशा एक ना अनेक गोष्टी यादरम्यान आपण पाहत असतो, त्यांची गरजेनुसार सर्व गोष्टी मिळवत असतो. पण, आता या भल्यामोठ्या प्रक्रियेमध्ये आणि त्यातही जर तुम्ही एखादा जुना फ्लॅट किंवा घर खरेदी करत असाल तर, या प्रक्रियेमध्ये तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागानं केलेल्या सुविधेनुसार आणि नव्या प्रशासकीय निर्णयानुसार नव्याने खरेदीखत केलेल्या जुन्या मालमत्तेवरील कर आणि पाणीपट्टी तुमच्या नावावर होण्यासाठी आता महापालिकेत सतत फेऱ्या मारण्याची गरज नाही. ही सुविधा आता दस्त नोंदणीवेळीच उपलब्ध करून दिली जाणार असून, यामध्ये पुणे, पिंपरीसह राज्यातील 15 महापालिकांचा समावेश आहे. प्रॉपर्टी कार्डवर असणाऱ्या युनिक आयडी क्रमांकावरून तुमच्या नावाचीच नोंद थेट महापालिकेच्या दप्तरी होणार आहे. 


महापालिकेच्या हद्दीत येणारं जुनं घर, फ्लॅट खरेदी केल्यास त्यावरील पाणीपट्टी बिल आणि मालमत्ता कर स्वत:च्या नावावर करण्यासाठी महापालिकेत स्वतंत्र अर्ज द्यावा लागतो. या टप्प्यावर तुम्हाला सतत पालिकेच्या कचेरीत हेलपाटेही मारावे लागतात. पण, आता त्यासाठीचेही नियम बदलले आहेत याची नागरिकांनी नोंद घ्यावी. 


नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने ही सुविधा मुंबईसह पूर्ण महापालिकेला उपलब्ध करून दिली होती. सध्या मुंबई महापालिकेत ही सुविधा सुरू असून पुणे महापालिकेत मात्र काही तांत्रिक कारणास्तव ती बंद ठेवण्यात आली आहे. सध्या नोंदणी 'आय सरिता' या प्रणालीचं एकत्रिकरण करण्यात आलं आहे. त्यामुळे दस्त नोंदणी करताना संबंधित मालमत्तेचा युनिक आयडी अर्थात ईपिक क्रमांक दस्त नोंदणीवेळेस नमूद करावा लागणार आहे. 


हेसुद्धा वाचा : दिवसा उन्हाळा, रात्री हिवाळा; राज्यात हवामानाची विचित्र स्थिती, पाहा तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती 


पुणे व पिंपरीत ही सुविधा येत्या महिनाभरातच सुरू होणार असून अन्य महापालिकांसोबतच्या प्रस्तावावर कार्यवाही सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान दस्त नोंदणी झाल्यानंतर नोंदणी व 
मुद्रांक शुल्क विभागाने ही माहिती महापालिकेला ऑनलाइन दिल्यानंतर त्यांच्याकडील प्रणालीद्वारे तुम्ही खरेदी केलेली मालमत्ता तुमच्या नावावर नोंदवली जाईल. पुढे पाणीपट्टी आणि मालमत्ता कर तुमच्या नावावर दिसू लागेल.