राणीच्या बागेतील प्रस्तावित मत्सालय मुंबई महापालिकेकडून रद्द, भाजपची टीका
आंतरराष्ट्रीय दर्जाचे डोम पद्धतीचे मत्स्यालय उभारण्याचा विचार होता. पण आता तो रद्द झाला आहे.
मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील प्रस्तावित मत्स्यालय महापालिकेनं रद्द केलंय. या प्रकल्पाची निविदा रद्द करण्यात आली आहे. राणीच्या बागेतील पेंग्विन कक्षात आंतरराष्ट्रीय दर्जाचे डोम पद्धतीचे मत्स्यालय उभारण्यासाठी पालिकेने निविदा मागवल्या होत्या. त्यासाठी 44 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला होता.
पुढील वर्षभरात मत्स्यालय उभारण्याचे कामही सुरू होणार होतं. मात्र, वरळी दूध डेअरी या ठिकाणी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मत्स्यालय उभारलं जाणार आहे. म्हणून राणीबागचा प्रकल्प युवराजांनी रद्द केला, असा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विटरवरून केला आहे.
राणीच्या बागेत दररोज हजारो लोकं येत असतात. पर्यटकांना त्यामुळे पेंग्विनसह भागात मत्स्यालय देखील पाहायला मिळेल असं नियोजन होतं. पण आता हा निर्णय महापालिकेने मागे घेतला आहे. भाजपकडून या निर्णयावर टीका केली जात आहे.