मुंबई: मृत्यूपश्चात शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना १० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय जाहीर करून भाजपा सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. नव्या पेन्शन योजनेला शासकीय कर्मचाऱ्यांचा विरोध असून सरकारचा निषेध कऱण्यासाठी जुनी पेन्शन हक्क संघटनेने गांधी जयंतीदिनी मुंबईतील आझाद मैदानात सकाळी १० वाजता आत्मक्लेश आंदोलन कऱण्याचा निर्णय घेतला आहे. जुनी पेन्शन योजनेची मागणी करत रस्त्यावर उतरू पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन दिंडीचा धसका घेतल्यानेच सरकारने हा निर्णय जाहीर केल्याची प्रतिक्रिया जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी व्यक्त केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या पेन्शन योजनेत स्पष्टता नाही. शासकीय कर्मचाऱ्यांच्या भविष्याची तरतूद नाही. आजही हजारो मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांची कुटुंब वाऱ्यावर आहेत. नव्या पेन्शन योजनेत सरकार शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कापणारी रक्कम आणि सरकारची रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवत आहेत. 


अर्थात हजारो कोटी रुपये उद्योगपतींना वापरण्यास देत आहे. या योजनेविरोधात सातत्याने आंदोलने केली. सर्व विरोधी पक्ष, आमदार, मंत्री यांना निवेदने दिली. मात्र प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांवर आत्मक्लेश आंदोलनाची वेळ आली आहे. यापुढील सर्व आंदोलन गांधीगिरी पद्धतीने करणार असल्याचेही वितेश खांडेकर यांनी सांगितले.