मुंबई : सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunratna Sadavarte) यांना न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावल्यानंतर त्यांना मुंबईत आणण्यात आलं. आज त्यांना पुन्हा गिरगाव न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकीलांनी मोठी माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अॅड गुणरत्न सदावर्तेंच्या घरामध्ये नोटा मोजण्याचं मशीन सापडल्याचं विशेष सरकारी वकील अॅड प्रदीप घरत यांनी गिरगाव कोर्टात सांगितलं. मुंबईतील गावदेवी पोलिसांनी सदावर्तेंची पुन्हा कोठडी मागितली आहे. त्यावर सुनावणीत सरकारी वकिलांनी नवी माहिती समोर ठेवली. 


नोटा मोजण्याच्या मशिनमधून 85 लाख रुपये मोजले गेल्याचं ते म्हणाले. याखेरीज त्यांच्या घरात अनेक संशयास्पद कागदपत्रं आढळली असून त्याच्या चौकशीसाठी कोठडीची मागणी करण्यात आली आहे. 


भायखळा आणि परेल इथं सदावर्ते यांनी प्रॉपर्टी घेतली असून गाडी देखील घेतली आहे. हे सर्व कर्मचाऱ्यांकडून घेतलेल्या पैशांतून घेतल्याचा संशय आहे, त्यामुळे सदावर्ते यांची गावदेवी पोलीस स्टेशनला पोलीस कोठडी हवी आहे.  आलिशान गाडी केरळमधून खरेदी केली असून RTGS ने 23 लाख रुपये दिले गेल्याची माहितीही समोर आली आहे.


डेपो प्रमाणे व्हॉट्सॲप ग्रुप बनवले गेले, ज्यातून माहिती फॉरवर्ड केली जायची अशी माहितीही समोर आली आहे. 


याखेरीज कोल्हापूर आणि अकोला जिल्ह्यातील अकोट पोलिसांनीही कोठडी मागितली आहे. उद्या सदावर्तेंना कोर्टात हजर केलं जाणार असून कोठडी कुणाला मिळणार, याचा निर्णय होईल.


इतर तीन आरोपींना पोलीस कोठडी
दरम्यान, अन्य 3 आरोपी संदीप गोडबोले, अजित मगरे आणि मुदलियार आरोपी कोर्टात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्यांना 22 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. मगरे आणि गोडबोले यांनी दोघा एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घराची रेकी केली, यांचा आणखी काही लोकांवर हल्ला करण्याचा प्लान होता, असा संशय आहे.