नवी दिल्ली: महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी असलेल्या पुणे शहराने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.  केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास विभागाने सोमवारी देशातील राहण्या आणि जगण्यायोग्य शहरांची यादी प्रसिद्ध केली. यामध्ये पुण्याने अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर नवी मुंबई आणि मुंबईने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे जगण्यासाठी योग्य अव्वल १० शहरांमध्ये महाराष्ट्रातील चार शहरांचा समावेश आहे. तर दुसरीकडे राजधानी दिल्ली थेट ६५ व्या क्रमांकावर घसरली आहे. ठाणे शहर सहाव्या स्थानी आहे. यामध्ये उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूतील एकाही शहराला अव्वल १० मध्ये स्थान मिळवता आलेले नाही. 


कोलकाताने या सर्व्हेक्षणात भागच घेतला नव्हता. त्यामुळे कोलकाताचा या यादीत समावेश करण्यात आला नसल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केले. संस्था आणि प्रशासन, सामाजिक पायाभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्य, त्याचबरोबर आर्थिक घटक आदींचा विचार करून ही यादी तयार करण्यात आली आहे. ४ दशलक्ष लोकांचे सर्वेक्षण करुन हा अहवाल तयार करण्यात आल्याचे केंद्राने सांगितले.