येस बँकेप्रमाणेच पंजाब, महाराष्ट्र सहकारी बँक ठेवीदारांना दिलासा द्या - नाना पटोले
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या ठेवीदार आणि खातेदारांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने येस बँकेप्रमाणे प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली
मुंबई : पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या नऊ लाख ठेवीदार आणि खातेदारांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने येस बँकेप्रमाणे प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. बँकेवर नेमण्यात आलेले प्रशासक, आर्बिट्रेटर आणि आरबीआय यांनी यासाठी तातडीने पावले उचलत मालमत्ता विक्रीतून निधी उभारावा, असे पटोले यांनी म्हटले. मंगळवारी याबाबत विधानभवनात झालेल्या बैठकीत त्यांनी याबाबत सूचना केल्या.
पंजाब व महाराष्ट्र को. ऑप बँकेच्या ९ लाख ठेवीदारांना, खातेदारांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने येस बँक अडचणीत आल्यानंतर ज्याप्रमाणे प्रस्ताव तयार करत कार्यवाही केली, त्याचप्रमाणे या प्रकरणातही प्रस्ताव तयार करण्यात यावा. बँकेवर नेमण्यात आलेले प्रशासक, आर्बिट्रेटर आणि आरबीआय यांनी तातडीने पावले उचलत मालमत्ता विक्रीतून निधी उभारुन बँकेच्या क्रियान्वयनास चालना द्यावी, अशा स्पष्ट सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या.
आरबीआयने नऊ लाख ठेवीदार खातेदारांचे हित डोळ्यासमोर ठेवून येस बँकेच्या धर्तीवर प्रस्ताव तयार करावा. आयुष्यभराची पुंजी बँकेत ठेवली, बँक बुडाल्याने मानसिक धक्का बसून तसेच खचून काहींचा मृत्यू झाला आहे. ठेवीदारांच्या हितासाठी आरबीआय काय कार्यवाही करीत आहे, त्यासंदर्भात दर १५ दिवसांनी सद्य:स्थितीचा अहवाल वेबसाईटवर प्रदर्शित केला जावा आणि त्याद्वारे ठेवीदारांना माहिती उपलब्ध व्हावी अशी सूचनाही यावेळी विधानसभा अध्यक्षानी केली.
बैठकीत खातेदारांनी आणि ठेवीदारांनी आपल्या समस्या मांडल्या होत्या. अनेक ठेवीदार, खातेदार हे ज्येष्ठ नागरिक असून त्यांना दैनंदिन खर्चासाठी तसेच गंभीर आजार झालेल्या ठेवीदार, खातेदार यांना उपचार खर्चासाठी रक्कम देण्याबाबत बँकेवरील प्रशासकाने योग्य मार्ग काढावेत, अशा सूचना या बैठकीत विधानसभा अध्यक्ष यांनी दिल्या होत्या. या आदेशानुसार अनेक ठेवीदारांना मदत देण्यात आली असून याबद्दल ठेवीदारांनी नाना पटोले यांचे बैठकीत आभार मानले.