`आमच्या सुर्यमालेतील तळपता सूर्य तुम्हीच`, संजय राऊतांना लेकीकडून भावनिक शुभेच्छा
संजय राऊत यांना लेकीकडून 60 व्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांचा आज 60 वा वाढदिवस. संजय राऊत कायमच आपल्या रोखठोक बोलण्यामुळे ओळखले जातात. पण या तडफदार बोलणाऱ्या संजय राऊतांना लेकीने वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
पूर्वशी राऊत हीने आपल्या खास शैलीत बाबा संजय राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचप्रमाणे तिने यातून संजय राऊतांना प्रेमाचा सल्ला देखील दिला आहे. नुकतंच पूर्वशीचं लग्न झालं आहे. त्यामुळे सासरी गेलेल्या लेकीच्या शुभेच्छा संजय राऊतांसाठी देखील खास आहेत.
पूर्वशी राऊतची भावनिक पोस्ट
पूर्वशी आपल्या पोस्टमध्ये म्हणते,'ज्यांच्या असण्याने सगळीकडे आनंद पसरतो आणि ज्यांच्या आठवणी अतिशय उबदार आणि प्रेमळ आहेत. त्या बाबांना भरपूर यश, उत्तम आरोग्य आणि शून्य तणावाच्या शुभेच्छा!! आजचा दिवस तुमच्यासाठी अधिक प्रकाशाचा असो. आमच्या सुर्यमालेतील तुम्ही तळपता सूर्य आहात. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
या पोस्टमध्ये पूर्वशीने खास फोटो शेअर केला आहे. पूर्वशीच्या साखरपुड्यातील हा फोटो आहे. काही दिवसांपूर्वी पुर्वशीने आपल्या फेसबूक अकाऊंटवर वडिलांचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात संजय राऊत चक्क पेटी वाजवताना दिसत आहे. 'सामना'चे संपादक म्हणून, शिवसेना नेता म्हणून संजय राऊत केवळ फटकारे मारतात असा एक गैरसमज आहे. ते रूक्ष असावे असे अनेकदा अनेकांनी म्हटले आहे. पण ते तसे नाहीत. ते राजकारणापलीकडे वाचतात , ऐकतात आणि बोलतात, असंही पुर्वशी हिने म्हटल होतं.
खास फोटो शेअर करत पूर्वशी राऊतचे अनोखी पोस्ट
सामना'चा संपादक म्हणून, शिवसेना नेता म्हणून तो फक्त फटकारे मारतो असा एक गैरसमज आहे. तो रूक्ष असावा असे अनेकदा अनेकांनी म्हटले आहे. पण तो तसा नाही. तो राजकारणा पलीकडे वाचतो , ऐकतो आणि बोलतो. तो आजही सैगल , बेगम अख्तर , चंद्रू आत्मा ऐकतो.. ऐकताना गुणगुणतो....ते गुणगुणणे मनापासून असते. तो मूडमध्ये असला की त्याची बोटे टेबलावर तालात थिरकतात.. आज खुप वर्षांनी तो सक्तीने घरी होता. त्याचे रेग्युलर वाचन आणि लिखाण आटोपल्यावर त्याने त्याची लाडकी पेटी बाहेर काढली..ती स्वतः साफ केली... आणि आजची आमची संध्याकाळ संगीतमय करून टाकली.