Mumbai University: क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये देशातील सर्वोत्तम 20 शिक्षण संस्थाच्या यादीत मुंबई विद्यापीठाची मोहोर उमटली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकिंगमध्ये आशियातील सर्वोत्तम शिक्षण संस्थाच्या यादीत मुंबई विद्यापीठाने 67 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर राज्यातील पारंपारिक विद्यापीठाच्या यादीत द्वितीय स्थान पटकावले आहे. क्वाकरेली सायमंड ( क्यूएस) यांनी जगासह देशातील सर्वोत्तम शिक्षण संस्था आणि विद्यापीठांची यादी जाहीर केली असून या यादीमध्ये मुंबई विद्यापीठाची कामगिरी सर्वोत्तम आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत विद्यापीठाने वर्ल्ड रँकिंगमध्ये मोठी सुधारणा केली असून 1001-1200 च्या क्रमवारीच्या बँडमधून यावर्षी 711-721 बँडमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे विषयनिहाय क्रमवारीत मुंबई विद्यापीठाने जागतिक क्रमवारीत 101-150 या बँडमध्ये प्रवेश केला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगच्या अहवालानुसार, मुंबई विद्यापीठाने सर्वच क्षेत्रात उत्तम कामगीरी करत एंप्लॉयमेंट आऊटकममध्ये सर्वाधिक81.4  गुण प्राप्त केले आहेत. त्यापाठोपाठ सायटेशन पर फॅकल्टी वर्गवारीत 30.9, एंप्लॉयर रेप्युटेशन 28.8, इंटरनॅशनल रिसर्च नेटवर्क 18.3, एकेडमिक रेप्युटेशन 9.1, फॅकल्टी स्टूडेंट्स रेशो 2.8 याबरोबरच आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि शाश्वतता यामध्येही उत्तम कामगिरी केली आहे.  


विविध व्यावसायिक आणि कौशल्याधारीत अभ्यासक्रम सुरु 


गेल्या काही वर्षात मुंबई विद्यापीठाने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सामंजस्य करार करत विविध व्यावसायिक आणि कौशल्याधारीत अभ्यासक्रम सुरु केले आहेत. देशपातळीवर क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही मुंबई विद्यापीठाची कामगिरी अतुलनीय आहे. गेल्या पाच वर्षात विद्यापीठात 104 टक्क्यांनी पदवी आणि 112 टक्क्यांनी पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या जर्नल्स मध्ये  156 टक्क्यांनी संशोधन पेपर्स मध्ये वाढ झाली आहे. 


ज्ञानदानाच्या कार्यात विद्यापीठाचा मोलाचा ठसा


विद्यापीठाच्या 12 विभागांना अनेक राष्ट्रीय स्तरावरच्या कार्यक्रमात मान्यता मिळाली  आहे. विद्यापीठाशी सलंग्नित असलेले 80 हून अधिक प्राध्यापक हे विविध व्यावसायिक कार्यकारणींवर कार्यरत आहेत. तर गेल्या पाच वर्षात 18 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने येथील प्राध्यापकांना गौरविण्यात आल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. देशाची ज्ञानविषयक गौरवशाली परंपरा आणि वाढता सामाजिक-आर्थिक प्रभाव पाहता मुंबई विद्यापीठाने ज्ञानदानाच्या या पवित्र कार्यात आपला मोलाचा ठसा उमटवला आहे.


 साश्वत प्रयत्नांची ही फळनिश्पती


विद्यापीठातील सर्व घटकांनी संशोधन आणि विकासाच्या प्रक्रियेत केलेल्या विशेष आणि साश्वत प्रयत्नांची ही फळनिश्पती आहे, या निकालाचे समाधान असून भविष्यात रँकिंगमध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील राहील, अशी प्रतिक्रिया  मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी दिली.