आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण: कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता महापालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रभागात क्वारंटाईन सेंटर उभारले जाणार आहे. जेणेकरून रुग्णांवर योग्य उपचार होतील. यासाठी आज पालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांसोबत बैलबाजार प्रभागातील लग्नाच्या हॉल्सची पाहणी केली. 


धक्कादायक! ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णाचा मृत्यू?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कल्याण आणि डोंबिवलीत चाचण्यांची संख्या वाढवण्यात आल्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिली क्रीडा संकुलातील बंदिस्त जागेत १८५ खाटांचे कोविड रुग्णालय मंगळवारपासून सुरु करण्यात आले. तसेच डोंबिवली जिमखाना, पाटीदार भवन, कल्याणच्या लाल चौकी येथे कोविड सेंटरचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.

मात्र, नागरिकांना आपल्याच परिसरात राहता यावे, यासाठी प्रत्येक प्रभागात १०० ते २०० बेडसचे क्वारंटाईन सेंटर सुरु करण्यात येईल. या माध्यमातून संपूर्ण महापालिका क्षेत्रात जवळपास २५ हजार बेडस् उपलब्ध होतील. यासाठी मुख्यत: समारंभांसाठी वापरण्यात येणारी मंगल कार्यालये पालिकेकडून ताब्यात घेतली जात आहेत, अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली. 


दरम्यान, कालच केडीएमसी क्षेत्रातील कोव्हिड सेंटरमधील एक धक्कादायक प्रकार उघड झाला होता. कल्याण भिवंडी बायपासवर असणाऱ्या केडीएमसीच्या टाटा आंमत्रा कोविड सेंटरमध्ये रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाबाबत रुग्णांच्या तक्रारी येत आहेत. येथील जेवणात किडे असल्याचा आरोप काही जणांनी केला आहे. तसेच याठिकाणी डॉक्टर्सची संख्याही पुरेशी नसल्याची माहिती समोर आली होती. सध्याच्या घडीला कल्याण डोंबिवली परिसरात कोरोनाचे ९४९९ रुग्ण आहेत. यापैकी १४४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.