धक्कादायक! ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णाचा मृत्यू?

'ऑक्सीजनची गरज असताना रात्री ऑक्सिजन काढलं जात आहे', मृत्यूपूर्वी कोरोना रुग्णाचा आरोप

Updated: Jul 6, 2020, 09:55 PM IST
धक्कादायक! ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णाचा मृत्यू? title=
संग्रहित फोटो

उस्मानाबाद : माझ्यावर योग्य उपचार केला जात नाही, ऑक्सीजनची गरज असताना रात्री ऑक्सिजन काढलं जात आहे, रात्रीचे डॉक्टर नसतात, त्यामुळे त्रास होतो असा आरोप कोरोना झालेल्या रुग्णाने मृत्यू पूर्वी केला आहे. तसंच माझ्या जीवाचे काही बरं वाईट झाल्यास त्याला रुग्णालय जबाबदार असेल, असं या व्हिडिओत म्हणलेलं आहे.

मृत्यूपूर्वी व्हिडिओ करुन संपूर्ण परिस्थिती सांगणारे रमजान पटेल हे परंडा तालुक्यातील असू गावचे होते. 30 जून रोजी त्यांना आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची बाधा झाल्यानंतर उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचा 5 जून रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर हा व्हिडिओ zee24 तासच्या हाती लागला आहे. याबाबत मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की, अनेक वेळा आमचा भाऊ फोनवर डॉक्टर योग्य उपचार करत नसल्याचं सांगत होता, म्हणून जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना याबाबत कळवलं होत तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना सुद्धा मेल केलं असल्याचं मृत व्यक्तीच्या भावाने सांगितलं.

मात्र, रुग्णावर योग्य उपचार होत होता, आम्ही त्याला नेहमी ऑक्सिजन लावून उपचार केल्याचं, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी सांगितलं.

माझ्या भावाने मला वारंवार आपल्याला असा त्रास असल्याचं फोन करून सांगितलं होतं. मी याबाबत जिल्हाधिकारी उस्मानाबाद, खासदार ओमराजे निंबाळकर यांना कळवलं होत, ते त्याचा पाठपुरावा करत होते. माझ्या भावाच्या मृत्यूला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी, मृत व्यक्तीच्या भावाने केली आहे.