दीपक भातुसे, मुंबई : एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात असताना शिवसेना - भाजपची युती होणार की नाही याबाबत संदिग्धता कायम आहे. असं असताना जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असल्याचा दावा भाजपकडून केला जातो आहे. तर दुसरीकडे भाजपचे सर्व दावे शिवसेनेकडून खोडून काढले जात आहेत. शिवसेना-भाजपची युती होणार का? हा विषय राज्याच्या राजकारणात सध्या जोरदार चर्चेत आहे. स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा करणारी शिवसेना खासदारांच्या दबावाखाली आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप बरोबर युती करणार अशी इकडे चर्चा सुरू आहे. तर त्याच वेळी शिवसेनेकडून युतीची चाचपणी करण्यासाठी पक्षांतर्गत बैठकाही सुरू आहेत. मात्र भाजपबरोबर युतीची चर्चा सुरू आहे की नाही याबाबत शिवसेनेकडून अधिकृतपणे भूमिका मांडली जात नाही आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात मोठा भाऊ आपणच आहोत अशी वक्तव्य करून जास्त जागा पदरात पडल्या तरच शिवसेना भाजपबरोबर युती करेल असे संकेत शिवसेनेचे नेते देत आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून मात्र जागावाटपाची चर्चा पूर्ण झाले असून फॉर्म्युलाही निश्चित झाला असल्याची माहिती अनधिकृतपणे माध्यमांना दिली जात आहे. शिवसेनेबरोबर युती होणारच असा दावा भाजपचे अनेक नेते खाजगीत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना करत आहेत. त्यापुढे जाऊन लोकसभेत भाजप 25 आणि शिवसेना 23 जागा, तर विधानसभेत भाजप 145 आणि शिवसेना 143 जागा लढवणार असा फॉर्म्युला निश्चित झाल्याचं भाजपचे नेते सांगत आहेत. मात्र झी मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार युतीबाबत देवेंद फडणवीस आणि अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंशी फोनवर चर्चा केली आहे. या चर्चेत शिवसेनेने आधी विधानसभेचं जागावाटप पूर्ण करावं, विधानसभेत 1995 चा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करावा त्यानुसार शिवसेना 171 आणि भाजपा 116 जागा असे जागावाटप असावे अशी शिवसेनेची मागणी आहे. 


मात्र या चर्चेतूनही युतीचा जागावाटपाची बोलणी पुढे गेलेली नाही. भाजपकडून जागावाटपासंदर्भात अथवा फॉर्मुला संदर्भात केले जाणारे दावे शिवसेनेने स्पष्टपणे खोडून काढले आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरून निश्चित काय सुरू आहे याबाबत संदिग्धता कायम आहे. दोन्ही पक्षाचे नेते यासंदर्भात माध्यमांना अधिकृत भूमिका मात्र सांगायला तयार नाहीत.